वेंगुर्ला प्रतिनिधी
वेंगुर्ला-मांडवीखाडी मद्ये मंगळवारी दुपारी पोहण्यासाठी उतरलेला मूळ मोरगाव येथील रहिवासी व सध्या म्हापसा गोवा येथे वास्तव्यास असलेला १६ वर्षीय मुलगा यश भरत देऊलकर या मुलाचा मृतदेह बुडालेल्या ठिकाणीच आज बुधवारी पहाटे ४ वाजण्याच्या तरंगत्या स्थितीत दिसून आला. याप्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान यश याच्या निधनामुळे देऊलकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
तळवडा येथे आपल्या मामाकडे हा मुलगा आला होता. काल आपल्या मावशीसोबत वेंगुर्ला येथे फिरण्यासाठी गेला होता. झुलत्या पूलानजिक असलेल्या पाण्यात पोहण्याचा मोह त्यांना आरवला नाही. त्यामुळे यश देऊलकर (वय १६) आणि गौरव देवेंद्र राऊळ (वय १५) हे दोघे लहान मुलगे पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र, त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. त्यावेळी त्याठिकाणी असलेल्या दाजी बटवलकर या मच्छिमार बांधवाने तळवडे येथील १५ वर्षीय गौरव राऊळ या मुलाला वाचवले. मात्र, दुसरा यश पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जाऊन बुडाला होता. सायंकाळी उशिरापर्यंत गाडीमध्ये त्याचा शोध सुरू होता. मात्र तो सापडू शकला नव्हता. दरम्यान आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास यश याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. नातेवाईकांसह पोलिसांनी मच्छीमारांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
