वेंगुर्ला (प्रतिनिधी)
वेंगुर्ला बंदर येथे गुरुवारी रात्री बुडालेली होडी शुक्रवारी सकाळी मूठ समुद्रात आढळली असून ती मच्छीमारांनी वेंगुर्ले बंदरात आणली आहे. दरम्यान बुडालेल्या चार खलाशांपैकी रत्नागिरी येथील महादेव शंकर आंबेरकर (वय ६६ वर्षे) यांचा मृतदेह ही मोचेमाड समुद्रात शुक्रवारी मिळाला. पोलिसांनी तो मच्छीमारांच्या सहाय्याने बाहेर काढून शवविच्छेदनासाठी वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. तर दुसऱ्या खलाशाचा मृतदेह शुक्रवारी सायंकाळी सागरेश्वर समुद्रकिनारी सापडला असून, शिवराम कोल असे मृत झालेल्या खलाशाचे नाव आहे. तर उर्वरित दोन खलाशांचे मृतदेह आज शनिवारी सकाळी सापडले आहेत.
दरम्यान आज शनिवारी पहाटे ४.०० च्या सुमारास आझान मुनिलाल कोल (वय १८) याचा मृतदेह सागरेश्वर समुद्रकिनारी आढल्ला तर चांद गुलाम मोहम्मद (वय – १८) याचा मृतदेह नवाबाग समुद्रकिनारी सकाळी ७.०० च्या सुमारास आढळला आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय वेंगुर्ला येथे पाठविले.
बुडालेल्या खलाशांच्या शोधासाठी कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टर व बोटीद्वारे शोध कार्य सुरू होते. बंदरावर सर्व विभागांचे अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, तहसीलदार ओकार ओतारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले, फिशरीजचे अधिकारी रवींद्र मालवणकर यांच्यासह स्थानिक मच्छीमार, नागरिक, पोलीस पाटील आदी उपस्थित होते.
या अपघातात समुद्र किनारी पोहत आलेले नंदा ठाकू हरिक्रांता (४९), राजा कोल (२९) व सचिन कोल हे खलाशी पोहत आल्याने बचावले आहेत.