पारपोलीत ‘ट्री हाऊस’ व ‘फुलपाखरू महोत्सवा’ चे शानदार उद्घाटन..!
सावंतवाडी प्रतिनिधी
“पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास व्हावा, ही माजी
मुख्यमंत्री नारायण राणे यांची संकल्पना होती. केवळ संकल्पना मांडून न थांबता त्यांनी सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करून या ठिकाणी अनेक जागतिक दर्जाचे प्रकल्प राबवण्यासाठी प्रयत्न केले. पारपोली येथील ट्री-हाऊस आणि फुलपाखरू महोत्सवाच्या माध्यमातून या भागाचा कायापालट होणार असून येथील अर्थकारण बदलेल व हा जिल्हा जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान मिळवेल,” असा विश्वास राज्याचे मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी व्यक्त केला.
निसर्गसंपन्न पारपोली येथे वन विभागातर्फे साकारण्यात आलेल्या ‘ट्री-हाऊस’, भव्य स्वागत कमान आणि ‘पारपोली फुलपाखरू महोत्सवा’चा शानदार उद्घाटन सोहळा ना. नितेश राणे यांच्या हस्ते व स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी ते बोलत होते.
निधीची कमतरता भासू देणार नाहीः पालकमंत्री
आपल्या भाषणात पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले की, जिल्ह्याच्या विकासासाठी सिंधुरत्न योजनेतून अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प साकारले गेले आहेत. काही प्रकल्प निधीअभावी थांबले असतील, तर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्या प्रकल्पांना पुन्हा गती देऊन आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी आहे. स्थानिक सरपंच आणि ग्रामस्थांनी या परिसराच्या विकासासाठी नवनवीन संकल्पना मांडाव्यात, त्या पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.
गोव्यापेक्षा सिंधुदुर्गला पर्यटकांची पसंती मिळावी ! –
“आज मोपा विमानतळामळे पर्यटकांची मोठी संख्या या भागाकडे वळत आहे.
जेव्हा पर्यटक तीन दिवस सिंधुदुर्गात आणि एक दिवस गोव्यात घालवेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या जिल्ह्याचे अर्थकारण बदलेल,” असे राणे यांनी नमूद केले. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मोपा विमानतळापासून पारपोलीपर्यंत मोठे होर्डिंग्ज लावून या महोत्सवाचा प्रचार व प्रसार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
हत्ती प्रश्न व प्राणी संग्रहालयाचा मानस –
जिल्ह्यातील वन्यप्राण्यांच्या प्रश्नावर बोलताना ना. राणे म्हणाले की, हत्तींपासून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी वन विभागाच्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जातील. यासाठी ‘वनतारा’ची टीमही दोनवेळा पाहणी करून गेली आहे. तसेच, येत्या ४-५ वर्षांत या भागात भव्य प्राणी संग्रहालय (Zoo) उभारण्यासाठी वनमंत्र्यांना पत्र दिले असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे.
जमीन दात्यांचे मानले आभार!
आजच्या काळात पायवाटेसाठी कुणी जागा देत नाही, अशा स्थितीत या भव्य प्रकल्पासाठी ज्या ग्रामस्थांनी आपली जमीन दिली, त्यांचे ना. नितेश राणे यांनी मनापासून अभिनंदन केले.
या कार्यक्रमाला आमदार दीपक केसरकर, उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, पारपोली सरपंच कृष्णा नाईक, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, माजी नगरसेवक उदय नाईक, माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे, सहाय्यक वनसंरक्षक सुनील लाड, वैभव बोराटे, उपसरपंच संदेश गुरव, वनक्षेत्रपाल प्रमिला शिंदे, चौकुळ सरपंच गुलाबराव गावडे यांच्यासह वन विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
