सौरभ अग्रवालः योग्य खबरदारी घेणार असल्याची माहिती..
ओरोस प्रतिनिधी
राज्यातील बहुतांश जिल्ह्यात १९ जून
रोजी एकाचवेळी पोलीस भरती प्रक्रिया सुरू होत आहे. सिंधुदुर्गात सुद्धा १९ जून ते १ जुलै या कालावधीत ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. या कालावधीत जिल्ह्यात पाऊस जास्त असण्याची शक्यता आहे. परंतु पावसामुळे उमेदवारांच्या मैदानी चाचणीवर दुष्परिणाम होणार नाही. त्यांना कोणतीही दुखापत होणार नाही. कोणत्याही उमेदवारावर अन्याय होणार नाही, याची खबरदारी आम्ही घेणार आहोत, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिली.
डिसेंबर २०२४ अखेर रिक्त असलेल्या पदांसाठी पोलीस शिपाई आणि चालक पदाची भरती प्रक्रिया सिंधुदुर्ग पोलिसांकडून राबविण्यास सुरुवात झाली आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी पोलीस अधीक्षक अग्रवाल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी अपर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, पोलीस निरीक्षक दीपक हुंदळेकर आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात ११३ शिपाई पदासाठी ५ हजार ९२०, पाच बँड पथक पदासाठी ६८३ आणि २४ चालक पदासाठी एक हजार ३३९ अशाप्रकारे एकूण १८ हजार ४२ अर्ज दाखल झाल्याचे यावेळी अग्रवाल यांनी सांगितले.