महाराष्ट्र भाजपाचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम सर्वत्र प्रभावीपणे राबवणार – भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशालभाई परब यांचे ग्रामपातळीवर नियोजन
सावंतवाडी प्रतिनिधी
महाराष्ट्र भाजपाचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम सर्वत्र प्रभावीपणे राबवणार – भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांचे ग्रामपातळीवर नियोजनभारतीय जनता पार्टी केवळ मतांच्या राजकारणात रमणारा पक्ष नसून समाजकारण, पर्यावरण, आरोग्य आदी जनसामान्यांच्या प्रश्नात रस घेऊन काम करणारे समाजसेवी संघटन आहे. मागील आठवड्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संपूर्ण राज्यात निसर्ग आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी “एक पेड मा के नाम” हा उपक्रम राज्यभर राबवण्याचे आवाहन भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले होते प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या आईला वंदन म्हणून एक तरी झाड लावावे अशी ही संकल्पना आहे. यातून वृक्षारोपण कार्यक्रमाला मातीच्या आणि मातेच्या नात्याची भावनिकता लाभावी हा या मागचा हेतू आहे.
या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष श्री विशालभाई परब यांनी युवा मोर्चातर्फे “बांदा ते चांदा” असा हा उपक्रम राबवला जाईल याची ग्वाही दिली आहे. सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून हा उपक्रम राबवण्याची घोषणा करत त्यांनी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांमार्फत “वृक्षारोपण हेच आईला वंदन” असा अनोखा उपक्रम राबवण्याची तयारी पूर्ण केली आहे. सावंतवाडी पंचक्रोशी हायस्कूल, मळेवाड येथे जवाहरलाल नेहरू शाळा, आरोस येथे महाराष्ट्र राज्य कृषी सप्ताहानिमित्त करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना त्यांनी भाजपाच्या या उपक्रमाची माहिती दिली. कोकणचे नेते नारायणराव राणे, जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुरू झालेले हे वृक्षारोपणाचे काम युवा मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रात यशस्वी करून दाखवेल असा विश्वास विशालभाई परब यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांच्यासोबत ॲड अनिल निरवडेकर, केतन आजगावकर, दिलीप भालेकर आदी मान्यवर उपस्थित होते.