आमदार वैभव नाईक यांची मागणी केली मान्य..
सिंधुदुर्ग प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यापूर्वी रिक्त असलेल्या पोलिस पाटील पदांसाठी इच्छुक उमेदवारांची लेखी व तोंडी परीक्षा घेऊन उतीर्ण झालेल्या पात्र व्यक्तींची यादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र या प्रक्रियेला आता ३ महिने उलटून गेले तरी अद्याप या पात्र उमेदवारांना पोलीस पाटील पदांवर नियुक्ती देण्यात आलेली नाही. पात्र झालेल्या अनेक उमेदवारांनी आपली नोकरी , कामधंदा सोडून ते पोलीस पाटील पदावर नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे या उमेदवारांचे तीन महिन्याचे सुमारे ४५ हजार रुपयांचे नुकसान शासनाच्या दिरंगाईमुळे झाले आहे.याबाबत आज आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची भेट घेऊन ताबडतोब पोलिस पाटील पदांवर नियुक्त्या करण्याची सूचना केली. या मागणीची दखल घेत जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी कुडाळ प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूशे यांच्याशी संपर्क करून दोन दिवसांत पोलिस पाटील पदांवर नियुक्त्या जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत.