लाखो रुपये घेतल्याची दबक्या आवाजात चर्चा,मात्र या राजकीय पुढाऱ्यांची खोऱ्यात चर्चा??
फसवणूक झालेल्यांना न्याय मिळणार का?
कुडाळ (प्रतिनिधी)
तालुक्यातील एका राजकीय पक्षाचा माणगाव खोऱ्यातील दोन पुढाऱ्यांकडून सरकारी नोकरी लावतो असे आमिष दाखवून माणगाव खोऱ्यातील तरुणांकडून लाखो रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याची जोरदार चर्चा सध्या चौका चौकात आणि चहाच्या टपरीवर सुरू आहे. माणगाव खोऱ्यातील या दोन पुढाऱ्यांनी सुशिक्षित बेकार युवकाकडून प्रत्येकी लाखो रुपये घेऊन सरकारी नोकरीचे आमिष दाखवले.नोकरी निश्चित देणार याची खात्री देण्यासाठी त्यांना एका राज्यात ट्रेनिंगसाठी पाठवले. खोट्या जाळ्यात सापडलेले हे बिचारे तरुण तिथे गेल्यावर स्वखर्चाने राहू लागले. एक महिना झाला तरी तेथे तुम्ही कोण? इथे का आलात? अशी साधी विचारपूसही कोणी केली नाही.हे पाहून आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या ठिकाणी राहून खाणार काय म्हणून ते बिचारे गेल्या पावली आपल्या गावाकडे कसेतरी परत आले. आता हे सर्वजण या फसवणूक केलेल्या पुढाऱ्यांकडे आपण दिलेले लाखो रुपये परत मागत आहेत. इतकी मोठी रक्कम त्यानी कर्ज काढून, काहींनी जमीन विकून जमा केली होती आणि त्या पुढाऱ्याकडे मोठ्या विश्वासाने सुपूर्त केली होती असे बोलले जात आहे.
स्वतःला जनतेचे सेवक म्हणणाऱ्या या पुढाऱ्यांनी यापूर्वी सुद्धा अनेक बेरोजगार युवकांची अशीच क्रूर थट्टा कित्येक वेळा केल्याची ही बोलले जात आहे. मात्र या पुढार्यांचा राजकीय दबदबा असल्याने त्याची जाहीर वाचता कोणी केली नाही. त्याचप्रकारे बेकारीने होरपळलेले व फसवणूक झालेले हे बिचारे तरुण, दाद कोणाकडे मागणार ? आता या फसवणूक करणाऱ्या पुढार्यांची माणगाव खोऱ्यात नाका नाक्यामध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. युवकांनी अशा आमिषाला बळी पडू नये. अशा पुढार्यांपासून सावध राहावे. कुठल्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय आर्थिक व्यवहार करू नये अशी चर्चा सुरू आहे. मात्र ज्या तरुणांची सध्या फसवणूक झाली त्या तरुणांचे पैसे परत मिळणार का याचे उत्तर कोणीच देण्यास तयार नाही.