अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडू: जिल्हाप्रमुख मंदार शिरसाठ
सिंधुदुर्ग प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सवाचे वातावरण आहे. उत्सवाच्या निमित्ताने महिला वर्गाची स्वयंपाक घरात लगबग सुरू असून गॅस वितरण यंत्रणा मात्र गॅस धारकांना वेठीस धरत आहेत. तांत्रिक कारणामुळे गॅस धारकांची अडवणूक करण्यात येत असून किमान गणपतीच्या काळात तरी ही अडवणूक थांबवावी आणि गणेश भक्तांना दिलासा द्यावा, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन छेडू, असा इशारा युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाठ यांनी दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. चाकरमानि मोठ्या संख्येने गावाकडे येतात. आरती, भजने, पाहुणे यामुळे घराघरात माणसांची रेलचेल असते. सहाजिकच घरगुती वापराचा गॅस अधिक प्रमाणात लागतो आणि वर्षाच्या इतर वेळेच्या तुलनेत गणेशोत्सवात गॅस लवकर संपतो. सरकारने आणि गॅस वितरण यंत्रणांनी गॅस देताना अनेक औपचारिकता सक्तीच्या केल्या आहेत. ज्यात नोंदणीकृत मोबाईल क्रमांका वरून बुकिंग करणे, प्रत्यक्ष गॅसधारकांनी हजर राहणे, ओटीपी सांगणे या बाबी सक्तीच्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोबाईल नेटवर्क पुरेसे नसल्यामुळे ओटीपी येण्यास विलंब होतो त्यामुळे गॅस धारकांची मोठी अडचण होते. असंख्य गॅस धारक गॅस न घेताच घरी परतल्याच्या तक्रारी आल्या आहेत. वेळीच गॅस उपलब्ध न झाल्यामुळे सर्वाधिक कुचंबना घरातील महिलांची होत आहे. ही अडचण ओळखून सरकारी यंत्रणा आणि गॅस वितरण यंत्रणा यांनी किमान गणेशोत्सव काळात गॅस धारकांची अडवणूक थांबवावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा शिरसाट यांनी दिला आहे.
सरकार एकीकडे महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणते. महिलांसाठी अन्नपूर्णा योजना आणून तीन गॅस मोफत देण्यात येणार आहेत. मात्र हक्काचे आणि विकतचे गॅस घेताना महिलांची अडवणूक केली जात आहे हा मोठा विरोधाभास असल्याचे शिरसाट याचे म्हणणे आहे. गॅस देतानाच्या औपचारिकतांचे गणेशोत्सवानंतर पालन करावे त्याला आपली कोणतीही हरकत असणार नाही मात्र उत्सव काळात ही बंधने शिथिल करावी जेणेकरून गणेशोत्सव सुरळीत संपन्न होईल आणि नागरिकांची कोणतीही अडचण होणार नाही असे शिरसाट यांनी म्हटले आहे