सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
जिल्ह्यातील सर्वच महामार्गांवर ठिकठिकाणी मोठ्या आकाराचे अनधिकृत होर्डिंग्ज उभारण्यात आलेले दिसत असून ते भविष्यात पावसाळ्यात महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तसेच रहदारीच्या नागरिकांना घातक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. कालच मुंबई घाटकोपर येथे एका पेट्रोल पंपाशेजारीच उभारलेले लोखंडी होर्डिंग कोसळून भीषण दुर्घटना घडून त्यात 14 नागरिकांचा मृत्यू तर 35 जखमी झाल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांमधून समोर आल्या आहेत. याशिवाय होर्डिंगखाली पेट्रोल पंपावर असणारी तब्बल ८० वाहने अडकल्याची माहिती देखील समोर आली आहे. व्यावसायिक मार्केटिंगच्या स्पर्धेत अशाप्रकारे झालेली जीवित व वित्त हानी पाहता जिल्हा प्रशासनाने अशा धोकादायक व घातक ठरू शकणाऱ्या होर्डिंग हटवण्याची कारवाई करणे काळाची गरज व आवश्यकता बनली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्याने राष्ट्रीय तसेच राज्य व जिल्हा ग्रामीण मार्गांवर मोठ्या प्रमाणात लावलेल्या होर्डिंग्जवर सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपंचायत,नगरपरिषद, नगरपालिका व ग्रामपंचायतींना पावसाळ्यापूर्वी हटविणे संबंधित कार्यवाही करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.