वेंगुर्ला प्रतिनिधी
वेंगुर्ला बंदरात गुरुवार दिनांक २३ मे रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यावेळी होडी बुडाली. आज तात्काळ भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री.विशाल परब यांनी भेट देत स्थानिक ग्रामस्थांसह प्रशासनाशी संवाद साधला.
या दुर्घटनेत चार खलाशी होते. तीन जण पोहून किनाऱ्यापर्यंत पोहोचले आहेत. बुडालेल्या खलाशांचा शोध रात्रीपासून आतापर्यंत सुरू आहे. काल रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास ढगांचा गडगडात आणि विजांचा लखलखाट करत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. याच दरम्यान वेंगुर्ले बंदर येथून एका छोट्या होडीत माशांसाठी लागणारा बर्फ व अन्य साहित्य घेऊन सात खलाशी मोठ्या लॉन्चवर जाण्यासाठी निघाले होते. मात्र नऊ वाजण्याच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यामुळे होडी भरकटली आणि समुद्राच्या पाण्यात उलटली. यावेळी होडीवर असलेले सात खलाशी साहित्यासह समुद्राच्या पाण्यात पडले. त्यातील तीन खलाशी हे पोहून किनाऱ्यापर्यंत पोहोचले. मात्र चार खलाशी अद्याप पर्यंत सापडलेले नाहीत.
या पार्श्वभूमीवर आज भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री.विशाल परब यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. प्रशासकीय स्तरावर पोलीस आणि स्थानिक मच्छीमार अजूनही शोध कार्य करत आहेत.
प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळु देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, किसान मोर्चाचे बाळु प्रभु, युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर, मनोहर तांडेल, मच्छिमार सेलचे वसंत तांडेल, दादा केळुसकर, ओबीसी सेलचे शरद मेस्त्री, प्रमोद वेर्णेकर आदी उपस्थित होते.