पत्रादेवी येथील घटनाः अधिकारी व कर्मचारी यांनी वेळीच सुरक्षित ठिकाणी आसरा घेतल्याने मोठी दुर्घटना टळली..
बांदा दि.०२;-
कागदपत्रांच्या तपासणीसाठी पत्रादेवी (गोवा) येथील आरटीओ तपासणी नाक्यासमोर उभा असलेला कंटेनर हॅन्डब्रेक न ओढल्याने थेट आरटीओ कार्यालयात घुसला. सुदैवाने अधिकारी व कर्मचारी यांनी वेळीच सुरक्षित ठिकाणी आसरा घेतल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र तपासणी नाक्याची चौकी, दुचाकी व मोटार यांचे नुकसान झाले.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, आज दुपारी हरियाणा येथील कंटेनर (एचआर ६९सी ०६९९) तपासणीसाठी चालकाने पत्रादेवी गोवा येथील आरटीओ तपासणी नाक्यासमोर पार्क केला होता. चालक गाडीची कागदपत्रे घेऊन चौकीतील कार्यालयात गेला होता. मात्र चालक हॅन्डब्रेक ओढण्यास विसरल्याने कंटेनर थेट चौकीत घुसला. यावेळी त्याठिकाणी कार्यरत असलेले अधिकारी श्री गावकर व कर्मचारी यांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतल्याने ते बचावलेत. मात्र यामध्ये दुचाकी, मोटार व चौकीचे नुकसान झाले.