आंबेरी निवजे ओहोळावरील पुलाचे बांधकाम अपूर्ण,नागरिकांची प्रचंड प्रमाणात गैरसोय

संबंधित अधिकारी व ठेकेदार यांची चौकशी व्हावी,निवजे वासियांची मागणी

माणगाव (प्रतिनिधी)
माणगाव खोऱ्यातील आंबेरी निवजे या मुख्य रस्त्यावरील निवजे ओहोळावरील पुलाचे बांधकाम अपूर्ण असल्यामुळे निवजे पंचक्रोशीतील शालेय विद्यार्थी,रुग्ण,तसेच तातडीच्या कामासाठी माणगाव येथे येणाऱ्या नागरिकांची प्रचंड प्रमाणत गैरसोय झाली आहे. आंबेरी निवजे या मुख्य रस्त्यावरील ओहोळावरील पूल जीर्ण झाला होता.या पुलाचे काम मंजूर झाल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते.मात्र पुलाचे बांधकाम खूपच उशिराने सुरू करण्यात आले आणि सध्या माणगाव खोऱ्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने या निवजे ओहोळला पाण्याची साखळी सुरू झाल्यामुळे पुलाच्या बांधकामासाठी पर्यायी रस्ता पूर्णतः वाहून गेला आहे यामुळे निवजे गावचा आंबेरी माणगाव गावाशी संपर्क पूर्णतः बंद झाला आहे.ठेकेदाराने फक्त पुलाचे पिलर पूर्ण केले असून पूर्ण बांधकाम होण्यासाठी अजूनही सुमारे एक महिना लागणार आहे.या अपूर्ण कामामुळे क्लाससाठी येणारे शालेय विद्यार्थी ,तसेच रुग्ण यांची गैरसोय झाली आहे.जोराच्या पावसामुळे पर्यायी तयार केलेल्या मार्गावर चिखल व पाणी आल्यामुळे मोटार सायकल ,रिक्षा चारचाकी वाहने या मार्गावरून चालविणे शक्य नसल्याने निवजे पंचक्रोशीतील नागरिकांचा संपर्क तुटला आहे.याबाबत निवजे येथील नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.पाऊस जास्त प्रमाणात पडत असल्यामुळे बांधकाम पूर्ण बंद करण्यात आले आहे.निवजे गावात सध्या येणाऱ्या सावंतवाडी ,कुडाळ येथील एस. टी. बस सेवा निवजे गावात येत नसल्याने निवजे पंचक्रोशीतील नागरिकांची गैरसोय झाली आहे याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग,संबंधित अधिकारी ठेकेदार यांची चौकशी व्हावी तसेच निवजे पंचक्रोशीतील नागरिकांची गैरसोय दूर व्हावी यासाठी संबंधित अधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे निवजे वासियानी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page