धार्मिक उन्मादी राजकारणाला साहित्यिकांचे प्रोत्साहन; सत्ताधारी आणि साहित्यिक युती निकोप समाजासाठी धोकादायक: कवी अजय कांडर

सावंतवाडी: नाटककार कवी सिद्धार्थ विष्णू तांबे स्मृती पहिले आंबेडकर चौक साहित्य संमेलन २०२६ सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर येथे अनेक विचारवंतांच्या उपस्थितीत थाटात पार पडले. यावेळी धार्मिक उन्मादी राजकारणाला साहित्यिकांचे प्रोत्साहन मिळत असल्याने सत्ताधारी आणि साहित्यिक यांची युती निकोप समाजासाठी धोकादायक आहे. अशावेळी व्यवस्थेला शरण न जाणारा लेखक कवीच चांगले लेखन करू शकतो आणि असेच लेखन नाटककार कवी सिद्धार्थ विष्णू तांबे हे करत होते. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी आंबेडकर चौक साहित्य संमेलनचे आयोजन करणे ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे, असे मत पहिल्या आंबेडकर चौक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना कवी अजय कांडर यांनी व्यक्त केले.
संमेलनाचे उद्घाटन काहीसे आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्यात आले. उद्घाटक ॲड.अनिल निरवडेकर व इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षाला जल अर्पण करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर साहित्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे जेष्ठ कवी वीरधवल परब, प्रा.एस. एन. पाटील, सिद्धार्थ तांबे लेखन पुरस्कार प्राप्त सत्कारमूर्ती ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे, सिद्धार्थ तांबे कार्यकर्ता पुरस्कार प्राप्त अनिल जाधव, ज्येष्ठ कवी अरुण नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक मधुकर मातोंडकर यांनी केले तर सूत्रसंचालन कवी विठ्ठल कदम यांनी केलं.
यावेळी जेष्ठ कवयित्री सध्या तांबे यांना नाटककार कवी सिद्धार्थ तांबे स्मृती लेखन पुरस्कार तर सम्यक परिषद सिंधुदुर्गचे अध्यक्ष अनिल जाधव यांना सिद्धार्थ तांबे स्मृती कार्यकर्ता पुरस्कार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी साहित्य संमेलनाचे मुख्य अतिथी वीरधवल परब यांच्या हस्ते प्रभा प्रकाशन प्रकाशित कवी हरिश्चंद्र भिसे यांच्या “रानपुराण” या दीर्घकाव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले तर कादंबरीकार समीर वेंगुर्लेकर यांच्या “वारसदार” या कादंबरीचे प्रकाशन जेष्ठ कवयित्री संध्या तांबे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष पदावरून बोलताना कवी अजय कांडर पुढे म्हणाले की, विशिष्ट अस्मिता कुरवाळण्याच्या या काळात माणूस म्हणून जगणे फार कठीण आहे. साहित्यिकानी लिहून वेगळं होण्यात अर्थ नाही तर सामाजिक भूमिका म्हणून स्पष्ट बोललं पाहिजे. हा लिहिण्या आणि बोलण्याचा काळ आहे. बहुजन साहित्यिकांनी आपण काय करतो, आपली सामाजिक भूमिका काय? याचा गांभीर्याने विचार केलेला दिसत नाही. यावेळी बोलताना त्यांनी लोकमान्य टिळकांचे सुपुत्र श्रीधर पंत हे इतिहासातील महत्त्वाचे व्यक्तिमत्व असल्याचे अधोरेखित केले. श्रीधर पंत हे डॉ.बाबासाहेबांच्या विचारांचे होते, ते बाबासाहेबांना बंधुतुल्य मानत होते. श्रीधर पंतांचा इतिहास आपण लोकांसमोर आणू शकलो नाही याचीही त्यांनी खंत व्यक्त केली. साहित्यिकांनी आपल्या इतिहासाकडे एककल्ली न पाहता समतेचे हत्यार म्हणून पाहिलं पाहिजे. नाटककार सिद्धार्थ तांबे यांचे लेखन सामाजिक समता निर्माण करणारं होतं. “जाता नाही जात” सारखं नाटक जातीभेदावर भाष्य करताना सामाजिक समतेचा आग्रह धरते, म्हणून हा लेखक कवी पुढील काळात टिकणार आहे. यामुळेच त्यांच्या नावे आयोजित केलेल्या आंबेडकर चौक साहित्य संमेलनाचे मोल फार आहे.
संमेलनाचे प्रमुख पाहुणे वीरधवल परब यांनी सिद्धार्थ तांबे यांच्या अकाली निघून जाण्याचं दुःख आम्हा मित्रांना त्रासदायक ठरलं आहे असे सांगत त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित केलेलं हे आंबेडकर चौक साहित्य संमेलन हा त्याच्या मित्रांनी केलेला मोठा व्याप आहे. जातीवादी व्यवस्थेची उतरण अभेद्य आहे, ही व्यथा सिद्धार्थ तांबे यांनी आपल्या लेखनात मांडली होती. अल्प आयुष्यात त्यांनी ठोस लेखन केले होते परंतु, आंबेडकर चळवळीबाबत ते साशंक होते. त्यांनी आपल्या चळवळीची दिशा ठरवली होती. आंबेडकर चळवळीला देखील त्यांनी काउंटर केले होते. आंबेडकर चळवळीतही बाबा बुवा निर्माण झाले आहेत असे त्यांचे मत होते. आज परिवर्तन चळवळीतील माणसे वेगवेगळ्या ठिकाणी विभागली गेली आहेत त्या दृष्टीने हे साहित्य संमेलन अत्यंत महत्त्वाचे आहे असे मत वीरधवल परब यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे उद्घाटक उपनगराध्यक्ष ॲड.अनिल निरवडेकर यांनी पालिकेच्या माध्यमातून सावंतवाडीत होणाऱ्या साहित्यिक कार्यक्रमांसाठी योग्य ती मदत केली जाईल अशी ग्वाही दिली. मधुकर मातोंडकर आणि विठ्ठल कदम यांच्या संकल्पनेतून आंबेडकर चौक साहित्य संमेलन आयोजित करून सावंतवाडीच्या सांस्कृतिक वाटचालीत नव्याने भर टाकण्यात आली आहे. व्यक्तिगत पातळीवर मी मदत करेनच परंतु शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्याचा देखील प्रयत्न असेल असेही ते म्हणाले. यावेळी प्रमुख अतिथी प्रा.एस. एन. पाटील, सत्कारमूर्ती संध्या तांबे आणि अनिल जाधव यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात निमंत्रितांचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी अरुण नाईक हे होते तर व्यासपीठावर कोमसाप सावंतवाडी तालुकाध्यक्ष कवी दीपक पटेकर, कवयित्री कल्पना बांदेकर, ज्येष्ठ कवी कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्हाभरातून आलेल्या अनेक विचारवंत कवींनी आपल्या बहारदार रचना सादर करून कवी संमेलनात रंगत आणली. कविता सादर करणाऱ्या सर्व कविजनांना मान्यवरांचे हस्ते ग्रंथ भेट देण्यात आले. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका संजीवनी पाटील यांनी केले तर आभार कवी विठ्ठल कदम यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page