सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक वर्षापासून गावकऱ्यांमधील अंतर्गत मतभेद, समन्वय आणि मार्गदर्शनाचा अभाव, यामुळे कुलूप बंद असलेल्या देवी- देवतांच्या मंदिरांमध्ये महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या प्रयत्नामुळे पुन्हा चैतन्याचा घंटानाद घुमू लागला आहे. महासंघाने राबवलेले नामसत्संग, माणगाव येथील जिल्हा मंदिर परिषद आणि प्रत्यक्ष संवाद या त्रिसूत्रीमुळे विखुरलेले मानकरी एकत्र आले, तर अनेक देवस्थानाने सुव्यवस्थापन व धर्म रक्षणाची कास धरली आहे. अध्यात्मिक हानी रोखण्यासाठी महासंघाने उभारलेली ही संघटनशक्ती जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे. अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे संजय जोशी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम, मंदिर महासंघाचे शरद राऊळ , यशवंत परब, हिंदू जनजागृती समितीचे राजेंद्र पाटील, मंदिरांचे मानकरी घनश्याम राणे, गोविंद परब, शिवराम गावडे, दीपक गावडे, विलास गावडे, दत्ताराम राऊळ, जनार्दन भागवत, नांदरूख सरपंच श्री चव्हाण, सुनील राऊळ, जीवन केसरकर हे उपस्थित होते.
यावेळी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की जिल्ह्यात अनेक गावांमध्ये मानपानावरून तसेच काही शुल्लक कारणावरून मंदिरातील धार्मिक कार्यक्रम, पूजाअर्चा बंद पडल्या आहेत. त्यामुळे गावच्या एकोप्याला हानी पोहोचत आहे. गावची मंदिरे आणि तेथील धार्मिक कार्यक्रम सुरू राहिले तरच सर्व हिंदू समाज एकत्र राहणार आहे. मंदिर हे गावच्या एकीचे प्रतीक आहे. मंदिर हे ऊर्जास्रोत
तेथे चैतन्य मिळते त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही कारणास्तव बंद पडलेली मंदिरे पुन्हा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात माणगाव येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने मंदिर परिषद आयोजित करण्यात आली होती. या मंदिर परिषदेला जिल्हाभरातील मंदिरांचे मानकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशा प्रकारे राज्यभरात अनेक परिषदा आयोजित करून हिंदू धर्मियांना एकत्र करण्याचे काम सुरू आहे.
अनेक वर्षापासून मानपणावरून तसेच शुल्लक कारणावरून बंद असलेली मंदिरे पुन्हा एकोप्याने सुरू व्हावीत, तेथील धार्मिक कार्यक्रम, प्रार्थना, परंपरेनुसार होणारे सर्व कार्यक्रम व्हावेत यासाठी प्रत्येक गावात जाऊन तेथील मानकऱ्याना एकत्र घेऊन त्यांच्यातील मतभेद दूर करणे तसेच गावागावात वसलेल्या हिंदू धर्मीयांच्या मंदिरांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याला संबंधित मानकऱ्यांचा तसेच ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक वर्षापासून बंद असलेली मंदिरे पुन्हा सुरू करण्यात यश आले आहे. ही खरोखरच समाधानाची बाब आहे. यामध्ये सावंतवाडी तालुक्यातील घारपी उडेली येथील ग्रामदैवताचे मंदिर पुन्हा सुरू झाले आहे. माडखोल येथील श्री पावणाई रवळनाथ मंदिर, कुडाळ तालुक्यातील पडवे येथील देव रवळनाथ मंदिर तसेच कणकवली तालुक्यातील ओसरगाव येथील लिंग माऊली मंदिर, दोडामार्ग तालुक्यातील उगाडे येथील ग्रामदैवत मंदिर, मालवण तालुक्यातील नांदरुख येथील श्री देव गिरोबा मंदिर अशी अनेक मंदिरे गेली कित्येक वर्षापासून बंद होती. ही सर्व मंदिरे तेथील मानकरी आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून पुन्हा सुरू झाली असून विविध धार्मिक कार्यक्रम तसेच परंपरागत सुरू असलेले कार्यक्रम होऊ लागले आहेत. अद्यापही जिल्ह्यात सुमारे २५ हून अधिक मंदिरे अंतर्गत वाद व मानपणाव
बंद आहेत. या सर्व गावांना महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांच्यातील वाद समजून घेऊन तसेच हिंदूंची मंदिर संस्कृती, धर्मशास्त्रानुसार कार्यप्रणाली, याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. व तेथील किरकोळ असलेले वाद मिटवून पुन्हा ही मंदिरे सुरू करण्यासाठी आणि हिंदू धर्माप्रमाणे तेथील सर्व कार्यक्रम सुरळीत सुरू व्हावेत यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत. अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने देण्यात आली. यावेळी उपस्थित विविध गावचे मानकरी सर्वश्री घनश्याम राणे, गोविंद परब, शिवराम गावडे, दत्ताराम राऊळ, नांदरुख सरपंच श्री चव्हाण यांनी आपले विचार मांडताना महाराष्ट्र मंदिर महासंघाचे आभार मानले तर त्यांच्या पुढाकारामुळे अनेक वर्ष दुरावलेले मानकरी एकत्र आले.
त्यांच्यात संवाद व समन्वय साधून बंद असलेली मंदिरे सुरू व्हावीत सर्व हिंदू बांधवांनी एकत्र आले पाहिजे, मंदिरांचे पवित्र जपले पाहिजे, येथील धार्मिक कार्यक्रम एकोप्याने साजरे केले पाहिजेत, याबाबत यशस्वी मार्गदर्शन केल्याने आमची मंदिरे अनेक वर्षानंतर पूर्ववत सुरु झाली आहेत. आता सर्व कार्यक्रम एक विचाराने होऊ लागल्याने गावात चैतन्य निर्माण झाले असल्याची भावना यावेळी व्यक्त केली. तर अद्यापही ज्या गावात मानपणावरून अथवा किरकोळ कारणावरून बंद असलेली हिंदू देवतांची मंदिरे पुन्हा सुरू करण्यासाठी मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी पुढाकार घ्यावा. असे आवाहन त्यांनी केले.
