विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल येथे जॉब रेडीनेस कोर्स यशस्वीरित्या संपन्न

कणकवली :युवक कल्याण संघ संचलित विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल (ता. कणकवली) येथील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल यांच्या वतीने दि. १३ ते १८ जुलै २०२६ या कालावधीत “वन वीक जॉब रेडीनेस प्रोग्राम ऑन एम्प्लॉयबिलिटी अँड डोमेन स्किल्स” या प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडिया (APTI) व नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन (NPWA) यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला.
या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रशिक्षिका किशोरी चंद्रकांत सर्वदे यांनी विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख कौशल्यांचे प्रभावी प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणामध्ये संवाद कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास, आत्मविश्वास वृद्धी, मुलाखत कौशल्य, रेझ्युमे लेखन, सादरीकरण कौशल्य, टीमवर्क, नेतृत्वगुण तसेच व्यावसायिक आचारसंहिता यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. विविध उपक्रम, गटचर्चा आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. या सहा दिवसीय प्रशिक्षणानंतर विद्यार्थ्यांच्या संवाद कौशल्यात, आत्मविश्वासात, सादरीकरण कौशल्यात, नेतृत्वगुणांमध्ये तसेच व्यावसायिक दृष्टिकोनात लक्षणीय सकारात्मक बदल झाल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत हा उपक्रम त्यांच्या भावी करिअरसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, अशी भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. उपप्राचार्य डॉ. अमोल उबाळे व विभाग प्रमुख अमर कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजन व समन्वयाची जबाबदारी प्रा. शार्दुल एस. कल्याणकर (प्रशिक्षण व प्लेसमेंट समन्वयक) यांनी पार पाडली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
युवक कल्याण संघाचे अध्यक्ष श्री. वैभव नाईक, उपाध्यक्षा सौ. स्नेहा नाईक, सचिव डॉ. रमण बाणे तसेच व्यवस्थापकीय विश्वस्त प्रा. मंदार सावंत यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाविद्यालयाचे अभिनंदन केले. या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ होण्यास मदत झाली असून, उद्योग क्षेत्रातील स्पर्धात्मक वातावरणाला सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये विकसित करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page