भविष्यात मुलांनी शिक्षणाच्या जोरावर गावाबरोबरच शहर आणि देशपातळीवर आपल्या कर्तृत्वाचा डंका वाजवला पाहिजे;सरपंच सौ.मनीषा भोसले

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने माणगाव येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप..

कुडाळ (माणगाव):-
मुले ही केवळ एखाद्या कुटुंबाची नव्हे, तर संपूर्ण गावाची संपत्ती असून ग्रामीण भागातील या मुलांनी भविष्यात शिक्षणाच्या जोरावर गावाबरोबरच शहर आणि देशपातळीवर आपल्या कर्तृत्वाचा डंका वाजवला पाहिजे, असे प्रतिपादन माणगावच्या सरपंच सौ. मनीषा भोसले यांनी केले. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने माणगाव ग्रामपंचायत सभागृहात आयोजित गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू वाटप सोहळ्यात त्या मुख्य अतिथी म्हणून बोलत होत्या. या दिमाखदार सोहळ्यात परिसरातील अनेक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. आपल्या मार्गदर्शनात सरपंच सौ. मनीषा भोसले यांनी संघटनेच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत जिल्हाध्यक्ष मिलिंद धुरी, जिल्हा उपाध्यक्ष आनंद कांडरकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने राबवलेला हा उपक्रम अतिशय गौरवास्पद असून संघटनेच्या कार्याची महती अशीच उत्तरोत्तर वाढत जावो, अशी सदिच्छा व्यक्त केली.

कार्यक्रमात आपले विचार मांडताना संघटनेचे महिला जिल्हाध्यक्ष मानसी परब यांनी शिक्षकांचीच नव्हे, तर मुलांमध्ये उत्तम संस्कार रुजवून आदर्श विद्यार्थी घडविण्याची खरी जबाबदारी पालकांची देखील तितकीच असल्याचे सांगितले. आजच्या काळात केवळ शिक्षकांवर विसंबून न राहता, पालकांनी मुलांच्या जडणघडणीत सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. संघटनेच्या उपक्रमाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, आमच्या वतीने दिली जाणारी मदत खूप मोठी नसली, तरी या छोट्याशा उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी एक नवी उमेद आणि प्रोत्साहन मिळते. विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी आणि त्यांना अभ्यासाची गोडी लागावी, याच पवित्र हेतूने आमची संघटना सातत्याने हा कौतुकास्पद प्रयत्न करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुढे आर के सावंत म्हणाले गेली सलग तीन वर्ष आपण संघटनेच्या वतीने शैक्षणिक मुलांना शिकत असताना कुठेतरी व्यासपीठ मिळावे. त्यांचा मानसन्मान व्हावा.असे मुलांचे कार्यक्रम आपण राबवत असतो. कुठलाही व्यक्तीवर अन्याय झाला असेल . ही तक्रार शासन दरबारी मांडून तक्रारदाराला न्याय मिळवून देण्याचे काम आपल्या संघटनेच्या वतीने करण्यात येते.अशा अनेक लोकांना न्याय देण्याचे काम आपल्या संघटनेच्या वतीने करण्यात आले.
या सोहळ्याचे औचित्य साधून सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या मान्यवरांचा विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडीचे अध्यक्ष दीपक पटेकर यांना ‘तितिक्षा भावार्थ सेवा अंतर्गत तितीक्षा सोहळ्यात’ पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. तसेच सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पत्रकार रेवती वालावलकर, ७८ देशांत कार्यरत असलेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शैलेश मयेकर, जिल्हा सरचिटणीस अमित पालव आणि जिल्हा संघटक नयनेश गावडे यांचा विशेष गौरव करण्यात आला.

याच धर्तीवर, कु. मिताली मिलिंद धुरी हिने शिष्यवृत्ती परीक्षेत तसेच जवाहर नवोदय विद्यालय सांगेली ६ वी प्रवेश परीक्षेत ९१.२५% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केल्याबद्दल तिचे आई-वडील म्हणजेच मानव अधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मिलिंद धुरी व सौ. मनाली धुरी या दांपत्याचा विशेष सत्कार करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग ही संघटना गेली आठ वर्षे जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात अविरत कार्यरत आहे. गोरगरिबांचे प्रश्न प्रशासन दरबारी मांडून सामान्यांना न्याय मिळवून देणे हाच या संघटनेचा मुख्य उद्देश असल्याचे जिल्हाध्यक्ष मिलिंद धुरी यांनी यावेळी सांगितले. गेल्या आठ वर्षांत संघटनेने महिला दिनाचे औचित्य साधून अनेक महिलांचा, तसेच क्रीडा क्षेत्रात नावलौकिक केलेल्या खेळाडूंचा गौरव केला आहे. याशिवाय, विशेष कॅम्पचे आयोजन करून ४५ गरीब व गरजू लोकांना ‘बांधकाम कामगार योजना’ कार्ड मिळवून दिले, ज्याद्वारे त्यांना शिष्यवृत्ती आणि भांडी संचाचा लाभ मिळवून देण्यात आला आहे.

या सोहळ्याला सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र भिसे, संघटनेचे
सचिव विनोद जाधव, खजिनदार संदीप सुकी, कुडाळ तालुकाध्यक्ष आर. के. सावंत, सदस्य नामदेव जानकर, प्रगतशील शेतकरी शंकर (भाई) घाडी,आदी मान्यवरांसह गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक एकनाथ कुर्लेकर आणि सूत्रसंचालन भिवा सावंत यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिव विनोद जाधव यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page