आमदार दिपक केसरकर राजीनामा देणार का? जिल्हाध्यक्षा सौ.साक्षी वंजारी यांचा सवाल
सावंतवाडी प्रतिनिधी
नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात संदर्भात सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांचे नाव आल्याने व फोटो प्रसिद्ध झाल्यामुळे सावंतवाडीचे नाव येणे एक चिंतेची व लाजिरवाणी बाब आहे. त्यामुळे आमच्या सावंतवाडीचे नाव महाराष्ट्रात बदनाम झाले आहे. त्यामुळे निष्पक्षपणे एसआयटीद्वारे चौकशी होईपर्यंत आपला राजीनामा स्वतः आमचे स्थानिक आमदार राजीनामा देणार का?, असा सवाल काँग्रेस च्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षा सौ. साक्षी वंजारी यांनी उपस्थित केला आहे.
गेले आठ दिवस अशोक खरातचे नाव भोंदूगीरी, स्रीलंपटपणा, गरिबांच्या जमिनी बळकावणे यासाठी वेगवेगळ्या व्हिडिओ व फोटोद्वारे सगळीकडे प्रसिद्ध झाले. यात त्यांचे खास भक्त असलेल्या रुपाली चाकणकर यांनी एक स्त्री असून सुद्धा ताबडतोब आपल्या पदाचा राजीनामा दिला. मात्र वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवरून प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, फोटो मध्ये सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दिपक केसरकर यांचे नाव प्रामुख्याने पुढे येत आहे. २८८ आमदारांमध्ये सावंतवाडी विधानसभेचे आमदार दिपक केसरकर यांचे नाव देखील खास भक्त म्हणून वेगवेगळ्या फोटोद्वारे पुढे येणे ही आम्हां सावंतवाडी वासियांसाठी अतिशय लज्जास्पद आहे. या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व स्वतः आमदार दिपक केसरकर यांचा आमदारकीचा राजिनामा घेणार की आमदार स्वतः देणार की पवई एनकाउंटर प्रकरणाप्रमाणे केसरकर यांना क्लिनचीट मिळणार?, असा संतप्त सवाल सौ. साक्षी वंजारी यांनी उपस्थित केला आहे. यापूर्वी देखील आमदार केसरकर यांच्या बुवाबाजीच्या दंतकथा सावंतवाडी परिसरात चविष्टपणे चघळल्या जातात. त्या खऱ्या आहेत की काय असा आता सावंतवाडी मतदारसंघातील लोकांना प्रश्न पडत आहे मुळातच सावंतवाडी विधानसभेत निधी किती देतात की नाशिक, सिन्नर भागात जर रस्त्यासाठीचा निधी दिला जात असेल (अशी कुजबुज सोशल मिडियात जोरदार चालू आहे.) तर सावंतवाडी करांनी पाहायचे तरी कुणाकडे असा प्रश्न निर्माण होतो. अर्थात निवडणुका होईपर्यंत सावंतवाडी येथे थांबायचे व निवडणुका संपल्यावर या मतदासंघाला पोरके करायचे अशी मनोवृत्ती असलेल्यांकडून अजून कुठली अपेक्षा करायची असा सवालही सौ. साक्षी वंजारी यांनी उपस्थित
केला. हे प्रकरण अतिशय गंभीर असून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी यात त्वरीत लक्ष घालून दिपक केसरकर यांचा राजिनामा मागेपर्यंत केसरकारांनी वाट बघावी की स्वतः राजीनामा देऊन निक पक्षपणे चौकशीला सामोरे गेल्यास सावंतवाडी मतदारसंघातील एक नागरिक म्हणून अभिमान राहील अन्यथा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने मोठे जनआंदोलन केले जाईल असा इशारा देखील सौ. वंजारी यांनी दिलाय
