सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्य कार्यकारी अधिकारी पदी अनिरुद्ध देसाई यांची नियुक्त्ती;रिझर्व बँकेची मान्यता

सिंधुदुर्ग प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदी सहकार व बँकिंग क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेले कार्यक्षम अधिकारी अनिरुद्ध देसाई यांची पुनश्च नियुक्ती करण्यात आली आहे. रिझर्व बँकेने ३ ऑगस्ट २०२६ रोजीच्या आदेशान्वये या नियुक्त्तीस अधिकृत मान्यता दिली असून श्री. देसाई यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे. राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नितेशजी राणे यांनी नवनियुक्त सीईओ देसाई यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

देसाई यांनी सिंधुदुर्ग बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून पदभार सोडल्यानंतर हे पद रिक्त झाले होते आणि प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बँकेचा कारभार पाहत होते. आता रिझर्व बँकेच्या मान्यतेनंतर पुनश्च त्यांची या पदावर निवड करण्यात आली आहे.

अनिरुद्ध देसाई यांना सहकार आणि बँकिंग क्षेत्राचा २५ वर्षांपेक्षा जास्त कालावधीचा दांडगा अनुभव
आहे. यापूर्वी त्यांनी विशेष लेखापरीक्षक (सहकारी संस्था) या महत्त्वाच्या पदासह सिंधुदुर्ग जिल्हा बँक (२००४ ते २००८ आणि २०१० ते २०२२) व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (२० २०२२ ते २०२६) चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अत्यंत यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली आहे. पुणे जिल्हा बँकेत त्यांच्या कार्यकाळात कोअर बँकिंगची १००% अंमलबजावणी, ‘नेट एनपीए’ शून्य टक्के वर आणणे, १२०० हून अधिक महिला बचत गटांना पतपुरवठा आणि डिजिटल बँकिंगमध्ये बँकेला राज्यात प्रथम क्रमांकावर नेण्याचे मोठे यश मिळाले होते. तसेच सिंधुदुर्ग बँकेतील आपल्या पूर्वीच्या कार्यकाळात त्यांनी कोकणासाठी विशेष UPNRM प्रकल्प राबवला, बचत गट-बँक लिंकेज मजबूत केले आणि कृषी पतपुरवठ्यात मोठी वाढ केली. यासोबतच त्रिस्तरीय बँकिंग रचनेबाबत केंद्र व राज्य सरकारने स्थापन केलेल्या विविध महत्त्वाच्या समित्यांवर त्यांनी मार्गदर्शक म्हणून काम पाहिले आहे.

बँकेचे अध्यक्ष मनीष प्रकाश दळवी यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने गेल्या साडेचार वर्षांत अभूतपूर्व प्रगती साधली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page