कुडाळ महिला-बाल रुग्णालय ‘व्हेंटिलेटर’वर.!रिक्त पदे तत्काळ भरा

अन्यथा ‘शिवसेना स्टाईल’ आंदोलनाचा इशारा;युवासेनेची आक्रमक भूमिका

कुडाळ ( प्रतिनिधी)
कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालय गेल्या कित्येक दिवसांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी अत्यंत बिकट अवस्थेत असून अक्षरशः ‘व्हेंटिलेटर’वर टेकले आहे. डॉक्टर उपलब्ध नसल्याने दरमहा होणाऱ्या प्रसूतिकांची संख्या ७०० वरून १०० ते १५० वर घसरली असून, रुग्ण व गरोदर महिलांची प्रचंड हालछाप होत आहे. ही बिकट परिस्थिती सुधारून रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ व वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे लवकरात लवकर न भरल्यास ‘शिवसेना स्टाईल’ने तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा कुडाळ शिवसेना व युवासेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
या संदर्भात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कुडाळ महिला-बाल रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांची भेट घेऊन त निवेदन देण्यात आले
माजी आमदार वैभव नाईक यांच्या दूरदृष्टीतून आणि अथक प्रयत्नांतून कुडाळ, मालवण, कणकवली, वैभववाडी व देवगड या संपूर्ण जिल्ह्यातील महिला आणि बालकांच्या आरोग्यासाठी हे रुग्णालय सुरू करण्यात आले होते. सुरुवातीच्या काळात या ठिकाणी दरमहा तब्बल ६६० ते ७०० प्रसूती यशस्वीरीत्या होत होत्या. मात्र, सद्यस्थितीत स्त्रीरोग तज्ज्ञ आणि इतर डॉक्टर नसल्यामुळे हे प्रमाण अवघ्या १०० ते १५० वर आले आहे. केवळ डॉक्टरांच्या अभावामुळे ग्रामीण भागातील गरोदर महिलांना प्रसूतीसाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलवावे लागत आहे, ज्यामुळे रुग्णांची मोठी परवड होत आहे.

“एकीकडे सत्ताधारी लोकप्रतिनिधी या गंभीर समस्येकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत, तर दुसरीकडे गोरगरीब महिला व बालकांना उपचारांअभावी भटकंती करावी लागत आहे,” असा आरोप शिवसेनेने केला आहे. रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी वैद्यकीय अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.
या वेळी शिवसेना उप जिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुका संघटक बबन बोभाटे, जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर, युवासेना जिल्हा प्रमुख योगेश धुरी, पंचायत समिती सदस्या ममता धुरी, उप तालुका प्रमुख बाळा पावसकर, युवासेना शहर प्रमुख संदीप म्हाडेश्वर, उप शहर प्रमुख गुरु गडकर, उप शहर प्रमुख शैलेश काळप, युवासेना शहर समन्वयक अमित राणे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page