सिंधुदुर्गनगरी येथेअस्सल गावठी आठवडा बाजाराचा शुभारंभ;प्राधिकरण क्षेत्राला मिळाली हक्काची बाजारपेठ;शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीला चालना

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे प्रतिपादन..!

सिंधुदुर्गनगरी, दि.०९ ;-
सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्र झपाट्याने विकसित होत असून येथे वास्तव्यास असलेल्या अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांसाठी स्थानिक स्तरावर दर्जेदार आणि विश्वासार्ह बाजारपेठ उपलब्ध होणे काळाची गरज होती. ओरोस एस.टी. स्टँड परिसरात सुरू करण्यात आलेल्या “अस्सल गावठी आठवडा बाजारामुळे” आता प्राधिकरण क्षेत्राला स्वतःची हक्काची बाजारपेठ मिळाली असून नागरिकांना ताज्या भाज्या, फळे आणि स्थानिक सेंद्रीय शेतीमाल सहज उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा प्राधिकरण अध्यक्षा तृप्ती धोडमिसे यांनी केले.

ओरोस येथील एस.टी. स्टँड परिसरात आज अस्सल गावठी आठवडा बाजाराचा शुभारंभ जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तुकाराम ऊर्फ दादा साहिल, जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया वालावलकर, प्राधिकरण सदस्य प्रभाकर सावंत, ओरोसचे उपसरपंच पाडूरंग मालवणकर, रानबांबूळीचे सरपंच परशुराम परब, ग्रामपंचायत सदस्य राजश्री नाईक, संतोष वालावलकर यांच्यासह नागरिक, शेतकरी आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या की, गावठी बाजार सुरू करण्यासाठी अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि स्थानिकांनी घेतलेले परिश्रम निश्चितच कौतुकास्पद आहेत. या बाजारामुळे आता प्राधिकरण क्षेत्रातील नागरिकांना भाज्या आणि शेतीमाल सिंधुदुर्ग नगरी येथेच चांगल्या प्रतीचा आणि ताजा माल उपलब्ध होणार आहे. तसेच शेतकऱ्यांनाही थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार असल्याने त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.”

त्यांनी पुढे सांगितले की, प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून भविष्यात प्राधिकरण क्षेत्रातील मूलभूत सुविधा, बाजार व्यवस्था आणि नागरिकांच्या गरजांनुसार आवश्यक सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले जातील. प्राधिकरणाच्या माध्यमातून नागरिकाभिमुख उपक्रमांना प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शुभारंभानंतर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी बाजारातील प्रत्येक स्टॉलला भेट देत विक्रीसाठी ठेवलेल्या विविध भाज्या, फळे आणि सेंद्रीय उत्पादनांची माहिती शेतकऱ्यांकडून जाणून घेतली. तसेच या उपक्रमात उत्साहाने सहभागी झालेल्या शेतकरी आणि विक्रेत्यांचे अभिनंदनही त्यांनी केले.
हा “अस्सल गावठी आठवडा बाजार” दर शनिवारी सकाळी ७.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत भरविण्यात येणार असून येथे स्थानिक सेंद्रीय शेतीमालाचे “शेतकरी ते ग्राहक” थेट विक्री केंद्र कार्यरत राहणार आहे. त्यामुळे ग्राहकांना ताजा आणि नैसर्गिक शेतीमाल मिळण्यासोबतच स्थानिक शेतकऱ्यांनाही हक्काची विक्रीची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया वालावलकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राधिकरण सदस्य प्रभाकर सावंत यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page