२४ तास अखंडित व दर्जेदार वीजपुरवठ्याची मागणी ; ८५ हजार ग्राहकांवर स्मार्ट मीटर लादल्याचा गंभीर आरोप
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल ३ लाख ६३ हजार वीज ग्राहकांना २४ तास अखंडित, सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा मिळावा, तसेच ग्राहकांना त्यांच्या नागरिक हक्कांनुसार सेवा व नुकसानभरपाई मिळावी, या प्रमुख मागण्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेने ओरोस येथील इच्छापूर्ती मंगल कार्यालय येथे आयोजित वीज परिषदेत आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबत संघटनेच्या वतीने केंद्रीय वीज राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले आहे.
वीज ग्राहकांच्या विविध समस्या, अपेक्षा व मागण्या शासनासमोर मांडताना संघटनेने महावितरणच्या कारभारावर थेट सवाल उपस्थित केले असून, ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. वीज खंडित होण्यामुळे जिल्ह्यातील ग्राहकांना आर्थिक, मानसिक व सामाजिक त्रास सहन करावा लागत असल्याचेही संघटनेने नमूद केले आहे.
*प्रत्येक ग्राहकाला CPL ची अधिकृत प्रत द्या*
प्रत्येक वीज ग्राहकाला आगामी बिलासोबत Consumer Personal Ledger (CPL) ची अधिकृत प्रत देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. तसेच MERC सप्लाय कोड २०२१ मधील तरतुदीनुसार ग्राहकांना कृतिमानकाप्रमाणे नुकसानभरपाई, नियमानुसार लाभ व सेवा मिळावी, यावर संघटनेने जोर दिला आहे.
*८५ हजार ग्राहकांवर स्मार्ट मीटर लादल्याचा आरोप !*
निवेदनातील सर्वात गंभीर आरोप म्हणजे सिंधुदुर्ग सर्कलमधील ३ लाख ६३ हजार ग्राहकांपैकी अंदाजे ८५ हजारांहून अधिक प्लस वीज ग्राहकांना जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविण्यात आल्याचा दावा. ग्राहकांची लेखी अथवा तोंडी संमती न घेता, पारंपरिक वीज मीटर काढून स्मार्ट मीटर बसविण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
या प्रकाराची चौकशी करून दोषी अधिकारी-कर्मचारी तसेच संबंधित कंपनीच्या जबाबदार व्यक्तींवर भारतीय न्याय संहितेनुसार फौजदारी गुन्हे दाखल करून शिस्तभंगाची कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
*वीज ग्राहकांना हक्कांची जाणीव करून देण्यासाठी जनजागृती मोहीम*
वीज ग्राहकांचे हक्क, कर्तव्ये व अधिकार याबाबत जनजागृती करण्यासाठी वीज ग्राहक मेळावे, संवाद कार्यक्रम, ऊर्जा मित्र बैठका, पथनाट्यांसह विविध उपक्रम राबवावेत, अशी मागणी संघटनेने केली आहे. ग्राहकांना ऑफलाइन तसेच ऑनलाइन तक्रारी कशा नोंदवायच्या, याची माहिती देण्यासाठी प्रत्येक उपविभागात सुविधा केंद्र सुरू करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
*‘इंग्रजी नव्हे, मराठीत माहिती द्या’*
केंद्र सरकारच्या Electricity Act 2023 संदर्भातील माहिती जिल्ह्यातील वीज ग्राहकांना समजेल अशा मराठी भाषेत आणि मोठ्या अक्षरांत उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
*आपत्कालीन काळात अधिकारी-कर्मचाऱ्यांना फोन उचलणे बंधनकारक करा*
आपत्कालीन परिस्थितीत सिंधुदुर्ग सर्कलमधील ८० टक्क्यांपेक्षा अधिक महावितरण अधिकारी-कर्मचारी वीज ग्राहकांचे फोन उचलत नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांना तातडीने संपर्क साधता यावा, यासाठी विशेष आदेश काढून अधिकारी-कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
वीज ग्राहकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्यास संघटना अधिक तीव्र भूमिका घेईल, असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनावर सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे पदाधिकारी, वीज ग्राहकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रती पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री तसेच महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
यावेळी वीज ग्राहक संघटना अध्यक्ष संजय लाड, समन्वयक ॲड नंदन वेंगुर्लेकर, जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे व सौ.सुप्रिया वालावलकर, राजन परब, पांडुरंग मालवणकर, मनोहर सरमळकर, नागेश ओरोसकर, प्रकाश पावसकर, सौ.श्यामल जोशी, सुभाष दळवी, भूषण सावंत, प्रभाकर सावंत, अनंत मेस्त्री, गुरुनाथ कुलकर्णी, विनायक गायकवाड, संजय परब, श्रीमती मंगला ओरोसकर, प्रा.सुभाष गोवेकर, प्रदिप सुतार, तुषार पवार, प्रशांत खवणेकर, प्रमोद नलावडे, बुधाजी राणे, शरद लाड, सुशिल बर्वे, सुनिल जाधव, अजय मयेकर, तुषार परब, जयराम वायंगणकर, शिवराम आरोलकर, श्रीमती रसिका मुंज, सुशिल निर्बे, उदय दळवी आदी उपस्थित होते.
