जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून महसूलविषयक कामकाजाचा आढावा

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रांताधिकारी, तहसीलदारांना कामांना गती देण्याचे निर्देश

सिंधुदुर्ग प्रतिनिधी

शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचवण्यासाठी महसूल प्रशासनाने कामांना गती द्यावी, तसेच कोणत्याही स्तरावर कामकाजात दिरंगाई अथवा निष्काळजीपणा करू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत त्या जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकाऱ्यांशी संवाद साधत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात भूसंपादन उपजिल्हाधिकारी आरती देसाई, उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे, तहसिलदार चैताली सावंत उपस्थित होत्या.

या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी डिजिटल क्रॉप सर्व्हे म्हणजेच ई-पीक पाहणीच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला. शेतकऱ्यांना पीक विमा आणि नैसर्गिक आपत्तीच्या नुकसान भरपाईचा थेट लाभ मिळण्यासाठी पीक पाहणी अचूक असणे आवश्यक असून, तलाठी व कृषी सहाय्यकांनी क्षेत्रीय स्तरावर १०० टक्के नोंदणी तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी दिले. यासाठी सर्व महसूल अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रभेटी द्याव्यात. सोबतच आगामी जनगणनेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून जिल्हा जनगणना पुस्तिकेसाठी गावनिहाय भौगोलिक सीमा, लोकसंख्या आणि पायाभूत सुविधांची अद्ययावत माहिती विहित मुदतीत सादर करण्याच्या सूचना दिल्या. हे काम सिंधुदुर्गमधील ८ तालुके, ५ नगरपंचायती आणि ३ नगरपरिषदांमधील ७५६ गावांत सुरू आहे.

‘आपले सरकार’ सेवा केंद्रांच्या मानकीकरणाच्या प्रगतीचा आढावाही यावेळी घेण्यात आला. महसूल दप्तराच्या तपासणीबाबत बोलताना त्यांनी प्रलंबित ई-फेरफार तातडीने निकाली काढणे, सेवा हमी कायद्यानुसार नागरिकांना वेळेत दाखले उपलब्ध करून देणे आणि जनतक्रारींचे जलद निवारण करण्याचे आदेश दिले. सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार आणि तलाठ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील कामांचा दैनंदिन प्रगती अहवाल सादर करावा, असे सांगत कामकाजात पारदर्शकता आणि तत्परता ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

*नागरिकांना प्रारूप मसुदा मतदार यादीबाबत माहिती द्या*
बऱ्याच नागरिकांना मतदार यादीतील नावांबाबत शंका असू शकतात; त्यांना ही यादी केवळ प्रारूप मसुदा असल्याचे समजावून सांगावे. मतदार यादीचा प्रारूप मसुदा २४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आला असून, २३ सप्टेंबर २०२६ पर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. प्राप्त दावे व हरकतींवर सुनावणी घेऊन ते निकाली काढण्याची प्रक्रिया २२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण केली जाईल. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे, याबाबत लोकांमध्ये व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page