“पत्रकारांची लेखणी रोखण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही!” COEP प्रकरणावरून ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा प्रशासनाला इशारा

पुणे (प्रतिनिधी)
पुण्यातील प्रतिष्ठित सी ओ पी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या वसतिगृहातील वादाला आता नवे वळण मिळाले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपासून सुरू झालेल्या या प्रकरणात विद्यार्थी संघटनांमधील संघर्षानंतर पोलिसांत गुन्हे दाखल झाले आणि आता ए बी पी माझाचे पुणे प्रतिनिधी पत्रकार मंदार गोंजारी यांच्याविरोधातही तक्रार गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त समोर आले आहे. विद्यापीठ प्रशासनाने पत्रकाराने परवानगीशिवाय वसतिगृह परिसरात प्रवेश केल्याचा आरोप करत कायदेशीर तक्रार केली आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमने तीव्र नाराजी व्यक्त करत पत्रकारांवर अशा प्रकारे कायदेशीर कारवाई करून माध्यमांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. सी ओ पी परिसरातील घटनेनंतर पोलिसांनी आधी ए बी व्ही पी सदस्याच्या तक्रारीवरून एन एस यु आय आणि युवक काँग्रेसशी संबंधित ५० ते ६० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाच्या तक्रारीवरून
आणखी एक गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर पत्रकार मंदार गोंजारी यांनी सी ओ पी परिसरातील विद्यार्थ्यांच्या कथित प्रश्नांबाबत केलेले वृत्तांकनही चर्चेत आले आहे.

एबीपी माझाच्या अधिकृत संकेतस्थळावर गोंजारी यांच्या नावाने सी ओ पी प्रकरणावरील वृत्त प्रकाशित झाले आहे.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर पत्रकाराने वृत्तांकन करणे हा पत्रकारितेचा मूलभूत अधिकार आणि कर्तव्याचा भाग आहे. एखाद्या पत्रकाराने नियमांचे उल्लंघन केले असल्यास कायदा आपले काम करेल; मात्र पत्रकाराने केलेल्या वृत्तांकनामुळे प्रशासन किंवा सत्ताधारी अस्वस्थ झाले म्हणून पत्रकाराविरोधात कारवाई होत असेल, तर हा माध्यमस्वातंत्र्यासाठी गंभीर इशारा आहे, अशी भूमिका व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमने व्यक्त केली आहे.

सी ओ पी प्रकरणात विद्यार्थ्यांच्या शुल्क, शिष्यवृत्ती आणि विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्नांवरून वाद निर्माण झाल्याचे विविध वृत्तांतून समोर आले आहे. एका

विद्यार्थिनीने सुरुवातीला कॉलेजकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याचे सांगितले होते; त्यानंतर तिने दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्यावर दबाव निर्माण झाल्याचे सांगत राजकीय वादात आपल्याला ओढू नये, असे आवाहन केले.

म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न काय आहेत, त्यावर प्रशासनाची भूमिका काय आहे, विद्यार्थी संघटनांमध्ये नेमका संघर्ष कशामुळे झाला आणि पत्रकाराविरोधातील तक्रारीमागील वास्तविक कारण काय आहे, हे स्पष्टपणे समोर येणे गरजेचे आहे.

व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला.

म्हस्के म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर पत्रकाराने बातमी केली म्हणून पत्रकाराला गुन्ह्याच्या चौकटीत आणण्याचा प्रयत्न होत असेल, तर हा केवळ एका पत्रकाराचा प्रश्न राहात नाही; हा संपूर्ण माध्यमविश्वाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न बनतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page