ऋषितुल्य व्यक्तिमत्वास भावपूर्ण निरोप – डॉ. अरविंद खानोलकर यांना मळगाव वाचन मंदिरातर्फे वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

मळगाव, सावंतवाडी
बालरोगतज्ञ, सेवाव्रती आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्व असलेले कै. डॉ.अरविंद दत्तात्रय खानोलकर उर्फ सर्वांचे लाडके अरुण भाई (जन्म – १३ मार्च १९४४, मृत्यू – १७ ऑगस्ट २०२६) यांच्या दहाव्या दिवसानिमित्त कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर, मळगाव तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.

रमाकांत सूर्याजी खानोलकर सभागृहात आयोजित या सभेत समाजातील विविध स्तरातील मान्यवर, डॉक्टरांचे चाहते, कुटुंबीय आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रद्धांजली सभेच्या प्रारंभी वाचन मंदिराच्या कार्यवाह सौ. स्नेहा महेश खानोलकर यांनी प्रास्ताविक केले. डॉक्टरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांच्या सेवाव्रती कार्याचा गौरव करण्यासाठी ही श्रद्धांजली सभा आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले आणि उपस्थितांना आपल्या आठवणी व्यक्त करण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी सावंतवाडीचे सेवानिवृत्त प्राध्यापक सुभाष गोवेकर, सेवानिवृत्त सिंधुदुर्ग जिल्हा कामगार अधिकारी शेखर पाडगावकर, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी, प्रसिद्ध लेखक-कवी प्रकाश तेंडुलकर, समाज कल्याण भूषण तथा वाचन मंदिराचे संचालक चंद्रकांत जाधव, ग्रंथालयाचे ग्रंथपाल, मळगाव ग्रामपंचायत माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य आनंद देवळी आणि वाचन मंदिराचे अध्यक्ष महेश खानोलकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

प्रत्येक वक्त्याने डॉ. खानोलकर यांच्या मिश्किल बोलण्याची शैली, वरकरणी कठोर वाटणारा पण आतून अत्यंत हळवा स्वभाव, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचा परिपूर्ण वैद्यकीय चिकित्सा कौशल्य आणि हातचा गुण यावर भर दिला. केवळ डॉक्टर म्हणून नव्हे, तर वैद्यकीय सेवा ही सेवाभाव म्हणून आयुष्यभर जपणारे, रुग्णसेवेलाच ईश्वरसेवा मानणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी समाजात आपला अमीट ठसा उमटवला. गोरगरीब रुग्णांसाठी धावून जाणारे, पैशापेक्षा माणुसकीला महत्त्व देणारे आणि मळगाव-सावंतवाडीच्या असंख्य बालकांच्या जीवाला जीवदान देणारे डॉक्टर म्हणून त्यांची कारकीर्द अविस्मरणीय राहील, अशा शब्दांत सर्वांनी गौरव केला.
सभेच्या शेवटी उपस्थित मान्यवरांच्या श्रद्धांजलीपर मनोगतानंतर भावपूर्ण वातावरणात या श्रद्धांजली सभेची सांगता करण्यात आली. या सभेला ग्रामस्थ, वाचक आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page