खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला विश्वास..
कुडाळ प्रतिनिधी
येणाऱ्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने निलेश राणे यांचे नाव घोषित केले आहे. आमच्या विकासासाठी निलेश राणे यांच्यासारखा आमदार मिळतोय म्हणून लोकांनी समाधान व्यक्त केले आहे. या निवडणुकीत ५० हजाराच्या मताधिक्क्याने निलेश राणे निवडून येतील, असा विश्वास खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला. ते आज कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी खासदार नारायण राणे म्हणाले की, आम्ही तिन्ही जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आणणारच आहोत. गेल्या दहा वर्षात पंतप्रधान मोदी यांनी ज्या ५० योजना आणल्या त्यामुळे आपल्या देशाची प्रगती झाली. राज्य सरकारने सुद्धा मागील अडीच वर्षात महाराष्ट्र गतिमान रीतीने विकसित व्हावा यासाठी प्रयत्न केला आहे, असे प्रतिपादन खासदार नारायण राणे यांनी यावेळी केली.
या निवडणुकीत महायुतीकडून सर्वच चांगले उमेदवार दिले आहेत. महायुतीचे सरकार परत येईल असा माझा विश्वास आहे. तर जनहीत, जनकल्याण हे आमचे हित आहे, असेही नारायण राणे यावेळी म्हणाले.
अप्रतिम लोकप्रतिनिधी म्हणून निलेश राणे यांची ओळख
निलेश राणे सुशिक्षित असून याचा फायदा आपल्याला होईल. खासदार असताना सुद्धा निलेश राणे यांनी विकासात्मक दृष्टिकोन ठेवून काम केले. त्यामुळे त्यांची जनसामान्यात अप्रतिम लोकप्रतिनिधी म्हणून ओळख आहे. साहजिकचयामुळे ते विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी खासदार नारायण राणे यांनी विद्यमान ठाकरे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यावर टीकास्त्र सोडले. वैभव नाईक यांनी कुडाळ-मालवणमध्ये काहीही काम केलेले नाही. आज मालवणमध्ये अनेक सुविधा नाहीत. एसटी स्टँडवर स्वच्छतागृह नाही. हे त्यांचे अपयश आहे. वैभव नाईक हे निष्क्रिय आहेत. वैभव नाईक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रोज हजेरी लावायचे मग हे निष्ठावान कसे? असा प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केला. आम्ही कधीही कांट्रॅक्ट घेतले नाही आणि टक्केवारी सुद्धा नाही. ज्याला बोलता येत नाही असा आमदार पाहिजे की लोकसभेत काम केलेला आमदार पाहिजे हे लोकांनी ठरवावे.
माझी लाडकी बहीण योजना महत्त्वपूर्ण ठरेल
राज्य सरकारने राबविलेली माझी लाडकी बहीण योजना निलेश राणे यांच्या विजयात महत्वाची ठरेल. या योजनेचा फायदा लाखो माता भगिनींना झाला आहे. त्यामुळे निलेश राणे यांच्या विजयात हा टर्निंग पॉइंट ठरेल, असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला.
यावेळी मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार लढवायचा नाही, असा निर्णय घेतला, यावर खासदार नारायण राणे म्हणाले की, त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. आम्ही कोकणातले पिठीभात आणि मासे खाणारे आहोत.
तर शिवसेनेचे सदा सरवणकर हे आमचे उमेदवार आहेत. आमचा जो युतीचा उमेदवार आहे, त्याचे आम्ही काम करणार, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
बॉक्स…..
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्याची आम्ही मागणी केली आहे.
