कणकवली प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर नवीन कामांना मंजुरी, मंजूर कामांना कार्यारंभ आदेश देणे आदीबाबतची कार्यवाही होऊ शकत नाही. मात्र, आता सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्यामुळे निधी उपलब्ध असलेली कामे मंजूर करणे तसेच मंजूर कामांना कार्यारंभ आदेश देण्याच्या अनुषंगाने आचारसंहिता शिथील करण्याबाबत कार्यवाहीची गरज आहे. तसे झाल्यास पावसाळ्यापूर्वी आवश्यक असलेली कामे करणे शक्य होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अधिसूचना जारी करण्यात आल्यानंतर विकासकामांबाबत अटी व शर्थी लागू झाल्या होत्या. यात आचारसंहितेपूर्वी कार्यारंभ आदेश देऊन कामे सुरू केलेल्या कामांव्यतिरिक्त इतर कामे सुरू करणे किंवा मंजूर करण्यावरही बंधने येतात. त्यातच यावेळी आपली निवडणूक तिसऱ्या टप्यात असली, तरीही निकाल ४ जून रोजी जाहीर होणार असल्याने तोपर्यंत आचारसंहिता असणार आहे. मात्र, विकासकामे होण्याच्यादृष्टीने हाच कालावधी महत्वाचा असून मे महिन्यात आवश्यकता असलेली काही कामे पूर्ण होणे अथवा सुरू होण्याची गरज आहे. यात काही रस्ते, मोऱ्यांच्या कामांचा समावेश आहे. पावसाळ्यापूर्वी ही कामे न झाल्यास काही ठिकाणी वाहतुकीबाबत अडचणही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात मतदान झालेले असल्याने येथील आचारसंहितेत शिथीलता आणण्याची गरज आहे. त्यानुसार प्रशासकीय पातळीवर मार्गदर्शक सूचना मागवून कार्यवाही होण्याची मागणी होत आहे.
