सांस्कृतिक भवन साठी टप्या टप्प्याने अजून निधी देणार,राणेंचा शब्द म्हणजे बंदुकीची गोळी;पूर्ण होणारच
कणकवलीत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य ‘मराठा सांस्कृतिक भवन,कलादालन व उद्यान’ प्रकल्पाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न
कणकवली प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत कणकवली शहरात भव्य ‘मराठा सांस्कृतिक भवन, कलादालन व उद्यान’ प्रकल्पाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. राणे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जपणारे पारदर्शक व गतीमान प्रशासन देणे हे आमचे कर्तव्य आहे. कणकवलीकरांना दिलेला शब्द आज पूर्ण केला आहे. पुढील वर्षी याच दिवशी या भवनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
पालकमंत्री नितेश राणे पुढे म्हणाले, या भवनाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या सांस्कृतिक चळवळीला हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे. कला, संस्कृती आणि परंपरेचा वारसा जपणारे हे भवन सर्वांसाठी खुले असेल. ही वास्तू अधिक दर्जेदार व्हावी यासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच या वास्तूचा सांभाळ करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असेही त्यांनी नमूद केले.
“मी मराठा समाजाला शब्द दिला होता की, तुमच्या हक्काचे सांस्कृतिक भवन उभे करेन. राणे कुटुंबाचा शब्द म्हणजे बंदुकीतील गोळी असते, तो कधीही चुकत नाही. आज या वास्तूचे भूमिपूजन झाले असून, पुढच्या वर्षी १९ फेब्रुवारी २०२७ रोजी मुख्यमंत्री आणि नारायण राणे यांच्या उपस्थितीत या वास्तूचे दिमाखात उद्घाटन होईल,” असा ठाम विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
*शब्दाला जागणारे सरकार*
“आमचे सरकार शब्दाला जगणारे आहे. नगरपंचायत निवडणुकीच्या वेळी समाजातील बांधव मला भेटले होते, त्यांनी हक्काच्या वास्तूची मागणी केली होती. आज त्या मागणीची पूर्तता करताना मला अभिमान वाटतोय. केवळ घोषणा नाही, तर प्रत्यक्ष कृतीवर आमचा विश्वास आहे.”
*कणकवली करांचे राजकारणापलीकडचे नाते*
“सिंधुदुर्ग आणि राणे कुटुंबाचे नाते केवळ निवडणुकांपुरते नाही. २०१४ ते २०१९ या काळात आम्ही सत्तेत नव्हतो, पराभूत होतो, तरीही जिल्ह्यासाठी मेडिकल कॉलेज उभे केले. त्या विचारातूनच आम्ही घडलो आहोत. ही वास्तू उभी करताना सकल मराठा समाजाने आपल्या सूचना द्याव्यात, कारण ही वास्तू सांभाळण्याची सामूहिक जबाबदारी तुमची आणि आमची आहे.”
*इतिहासाची जपवणूक आणि तुलना करून पुढे गेले पाहिजे*
“शिवरायांनी आपल्याला अन्याय आणि दडपशाहीविरुद्ध लढायला शिकवले. त्यांनी स्वराज्य स्थापन केले आणि हिंदू धर्माचे रक्षण केले. आज काही लोक महाराजांची तुलना टिपू सुलतानाशी करतात, पण ती कधीच होऊ शकत नाही. ज्याने ८००० हिंदूंची कत्तल केली, तो टिपू महाराजांच्या नखाचीही सर धरू शकत नाही. महाराजांनी कधीही कोणत्याही मशिदीकडे वाकड्या नजरेने पाहिले नाही, त्यांनी न्यायाचे राज्य चालवले.”
*प्रशासनाची गती आणि पारदर्शकता*
“स्वराज्यात जसे पारदर्शक प्रशासन होते, तसेच आमचे प्रशासन गतीने काम करत आहे. जिल्हाधिकारी आणि सर्व यंत्रणांनी हे काम वर्षभरात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तुमचा सेवक म्हणून मी जिल्ह्याच्या सुख-समृद्धीसाठी आणि कोणत्याही संकटात सदैव तत्पर असेन.”
यावेळी , सखल मराठा समाजाच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांना अश्वारूढ शिवप्रतिमा देऊन शाल श्रीफळ आणि हार घालून सत्कार करण्यात आला. तर मराठा समाजाच्या माध्यमातून सर्व जनतेसाठी सांस्कृतिक भवन उपलब्ध करून दिल्याबद्दल
‘अक्षरसिंधू कलामंच’तर्फे पालकमंत्र्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मराठा समाजाच्या वतीने भाई परब यांनी कृतज्ञता व्यक्त केली.मराठा समाजाचे समन्वयक संतोष राऊळ यांनी एकूणच सांस्कृतिक भवनाच्या मंजुरीपर्यंतच्या वाटचालीचा लेखाजोखा मांडला पालकमंत्री निलेश राणे यांच्या कामाची पद्धत आणि समाजाप्रती त्यांच्या मनात असलेले प्रेम भावना बोलून दाखवली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजयकुमार सर्वगोड यांनी केले.
*उपस्थित मान्यवर:*
या सोहळ्याला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे,
पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, मराठा समाजाचे नेते एसटी सावंत, मराठा मंडळाचे उपाध्यक्ष अर्जुन राणे, सतीश सावंत,संदेश उर्फ गोट्या सावंत, प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, ॲड. उमेश सावंत, डॉक्टर चं.फ. राणे,दिलीप तळेकर, मनोज रावराणे, सकल मराठा समाजाचे सोनू सावंत बबलू सावंत, समीर सावंत, बच्चू प्रभूगावकर, महेश सावंत, महेंद्र सामरेकर, तेजस राणे संदीप राणे सुशील सावंत व्यंकटेश सावंत प्रकाश सावंत राजू राणे, अनुप वारंग, सुरेश सावंत, ॲड राजेंद्र रावराणे ,ॲड अभिजीत सावंत, शैली सावंत मेगा सावंत दिव्या राणे, साक्षी सावंत ,मेगा गांगण सायली सावंत अनुप वारंग, सुशांत राऊळ, ॲड. परब सौ. ठाणेकर, भाग्यलक्ष्मी साटम, सावी लोके, राजेंद्र परब,मुख्याधिकारी गौरी पाटील , भाजप जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर , कणकवली तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, भाजप युवा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
