शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महावितरण कार्यालयाला दीली धडक

ग्राहकांवर स्मार्ट मीटरची जबरदस्ती झाल्यास गाठ शिवसेनेची;वैभव नाईक यांचा महावितरण प्रशासनाला इशारा

कुडाळ प्रतिनिधी
स्मार्ट वीज मीटरची सक्ती, वाढीव वीज बिले आणि निकृष्ट दर्जाच्या धोकादायक भूमिगत वीज वाहिन्यांच्या मुद्द्यावरून आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने कुडाळ येथील महावितरण कार्यालयावर धडक दिली. माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या शिष्टमंडळाने महावितरणच्या अधिकाऱ्यांना तीव्र जाब विचारत धारेवर धरले.

ग्राहकांवर स्मार्ट मीटरची जबरदस्ती झाल्यास गाठ शिवसेनेशी आहे,” असा इशारा यावेळी वैभव नाईक यांनी महावितरण आणि संबंधित प्रशासनाला दिला.
महावितरणचे अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांच्याशी झालेल्या चर्चेत वैभव नाईक यांनी लोकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रकारावर तीव्र आक्षेप घेतला. अदानी कंपनीच्या माध्यमातून हे मीटर बसविले जात असल्यामुळे नागरिकांमध्ये मोठा संभ्रम आणि तीव्र नाराजी असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

यावर स्पष्टीकरण देताना अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांनी सांगितले की, “हे मीटर अदानी कंपनीचे नसून वेगवेगळ्या चार कंपन्यांचे आहेत. मात्र, मीटर जोडणीचे काम अदानी कंपनीमार्फत केले जात आहे.”

यावर वैभव नाईक यांनी स्पष्ट भूमिका मांडत, ग्राहकांना उपलब्ध असलेल्या मीटर पर्यायांची आधी माहिती द्यावी आणि कोणत्याही प्रकारे सक्ती करू नये, अशी मागणी केली. तसेच, मीटर बसवण्यासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांवर कोणताही दबाव आणू नये, असे बजावले. यापुढे ग्राहकांवर कोणतीही जबरदस्ती होणार नाही, असे आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले.

स्मार्ट मीटरसोबतच जिल्ह्यात सुरू असलेल्या भूमिगत वीज वाहिन्यांच्या कामांमधील

ढिसाळपणावरही यावेळी लक्ष वेधण्यात आले.

अनेक ठिकाणी या वाहिन्या रस्त्यालगत अत्यंत धोकादायक अवस्थेत पडून आहेत. निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त करत महावितरणने या कामांवर कडक देखरेख ठेवावी आणि सर्व त्रुटी तातडीने दूर कराव्यात, अशी मागणी नाईक यांनी केली. तसेच, पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होणार नाही याची खबरदारी घेत नागरिकांना चांगली सेवा देण्याची मागणीही ठाकरे शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.

बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी आमदार वैभव नाईक यांनी सरकारवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, “स्मार्ट मीटरबाबत सरकारची भूमिका पूर्णपणे दुटप्पी आहे. एकीकडे सक्ती नसल्याचे खोटे सांगायचे आणि दुसरीकडे टार्गेट पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणायचा, असा खेळ सुरू आहे. पण यापुढे जर महावितरणने किंवा मीटर बसवणाऱ्यांनी ग्राहकांवर जबरदस्ती केली, तर शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल, हे त्यांनी लक्षात ठेवावे.”

या धडक आंदोलनात शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक व कृष्णा धुरी, तालुकासंघटक बबन बोभाटे, अतुल बंगे, शहरप्रमुख संतोष शिरसाट, युवासेना तालुकाप्रमुख तथा पं.स.सदस्य योगेश धुरी, नेरूर विभाग प्रमुख शेखर गावडे, बाळा पावसकर, सुशिल चिंदरकर, अमित राणे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page