माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला एमबीबीएस डॉक्टरची नियुक्ती; ग्रामस्थांमध्ये समाधान
माणगाव, दि.24
माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून केंद्रासाठी एमबीबीएस डॉक्टरची तात्काळ नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
काल दिनांक 23 जून रोजी माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जन आरोग्य समितीची सभा अध्यक्ष दीपक नारकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रुपेश कानडे, गंगाराम सडवेलकर तसेच समितीचे सदस्य आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सभेदरम्यान माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात एमबीबीएस डॉक्टरची आवश्यकता असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. याबाबत आमदार नीलेश राणे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला असून त्यांच्या माध्यमातून डॉक्टर उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याची माहिती सभेत देण्यात आली.
विशेष म्हणजे, सभेत झालेल्या चर्चेनंतर अवघ्या एका दिवसात म्हणजेच आज दिनांक 24 जून रोजी डॉ. जाधव मॅडम यांची माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात एमबीबीएस डॉक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली. या तात्काळ निर्णयामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत अनेक गावे येत असून येथील नागरिकांना वैद्यकीय उपचारांसाठी अन्यत्र जावे लागत होते. आता एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध झाल्याने रुग्णांना प्राथमिक स्तरावरच अधिक चांगली वैद्यकीय सेवा मिळणार असून आरोग्यविषयक समस्यांचे त्वरित निराकरण होण्यास मदत होणार आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आरोग्य सेवांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याबाबतही चर्चा केली. डॉक्टर नियुक्तीच्या निर्णयाचे ग्रामस्थांनी स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे.
