शासकीय कार्यालयांत आता होणार ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’!

पं.स.सदस्य योगेश धुरी यांच्या मागणीला यश; ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे सर्व कार्यालयांना आदेश

बदलत्या हवामानामुळे घटणारे पावसाचे प्रमाण आणि भविष्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर, पंचायत समिती क्षेत्रातील सर्व शासकीय कार्यालये आणि ग्रामपंचायतींमध्ये प्राधान्याने ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ (पावसाचे पाणी पुनर्भरण)यंत्रणा बसवण्यात यावी, या पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांच्या मागणीला अखेर मोठे यश आले आहे. प्रशासनाने ही मागणी मान्य करत सर्व संबंधित विभागांना तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या पंचायत समितीच्या मासिक सभेत सदस्य योगेश धुरी यांनी हा अत्यंत महत्त्वाचा विषय उपस्थित केला होता.

सध्याच्या काळात पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस अनिश्चित आणि कमी होत आहे.भूजल पातळीत घट, पावसाचे पाणी वाहून गेल्यामुळे भूजल पातळी चिंताजनक रीतीने खाली जात आहे.
भविष्यातील पाण्याचा तुटवडा रोखण्यासाठी केवळ नागरिकांना सांगण्यापेक्षा आधी शासकीय कार्यालयांनी स्वतः ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ करून आदर्श निर्माण केला पाहिजे, असा आग्रही विचार योगेश धुरी यांनी मांडला होता.
पावसाचे पाणी संकलित करणे आणि भूजल पातळी वाढवणे ही आजची सर्वात मोठी गरज आहे. प्रशासनाने शासकीय इमारतींवर ही यंत्रणा बसवून इतर नागरिकांसमोर पाण्याचे महत्त्व पटवून दिले पाहिजे.

योगेश धुरी यांनी मांडलेल्या या मुद्द्याचे गांभीर्य ओळखून काल झालेल्या पंचायत समितीच्या सभेत ग्रामीण पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी यावर सकारात्मक निर्णय घेतला.
पंचायत समितीच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायती, उपकार्यालये आणि इतर शासकीय इमारतींमध्ये पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण (Rainwater Harvesting) करण्यासाठी तात्काळ आवश्यक ती पावले उचलावीत, अशा सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.
योगेश धुरी यांच्या या जनहितार्थ आणि दूरदृष्टीच्या मागणीचा प्रशासनाने स्वीकार केल्याने परिसरातील नागरिक व पर्यावरणप्रेमींमधून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page