माणगाव खोऱ्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन बोनस मिळावा

ॲड‌.दीपक काणेकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन..!

कुडाळ प्रतिनिधी
माणगाव खोऱ्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून देण्यात येणारा भात पिकाचा प्रोत्साहन बोनस तातडीने मिळावा, या मागणीसाठी माणगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांनी ॲड.दीपक काणेकर यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
माणगाव खोऱ्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर भात पिकाची लागवड करतात. भात हे येथील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक असून, त्यावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. शासनाकडून भात उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी बोनस अथवा अनुदान दिले जाते. मात्र, मागील वर्षी माणगाव खोऱ्यातील अनेक भात उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन बोनस अद्याप मिळालेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
भात उत्पादनासाठी लागणारा मजुरीचा खर्च, बियाणे, खते, औषधे तसेच इतर शेतीच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्या तुलनेत शेतकऱ्यांना मिळणारे उत्पन्न कमी असल्याने शासनाचा प्रोत्साहन बोनस शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना भात प्रोत्साहन बोनस अनुदान देण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे सांगितले असल्याचा उल्लेखही निवेदनात करण्यात आला आहे.
तहसीलदार श्री सचिन पाटील यांनी संबंधित विषयाची योग्य ती दखल घेतली असून, प्रशासकीय स्तरावर आवश्यक तो पत्रव्यवहार करून माणगाव खोऱ्यातील पात्र शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page