सावंतवाडी प्रतिनिधी
मातीचा गोळा हातात घेतला आणि त्याला कल्पकतेची जोड मिळाली की, त्यातून साकारते एक सुंदर कलाकृती! याच कल्पनेचा प्रत्यय सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली शाळा क्रमांक ५ येथे नुकत्याच झालेल्या आगळ्यावेगळ्या मातीकाम कार्यशाळेत आला. उपक्रमशील शिक्षक हंसराज गवळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या नाजूक हातांनी मातीपासून सुबक आणि आकर्षक श्री गणेशमूर्ती साकारत आपल्या कलागुणांना मुक्त वाट करून दिली.
गणरायाच्या आगमनाची चाहूल लागलेली असतानाच शाळेत आयोजित करण्यात आलेल्या या मातीकाम कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये अक्षरशः उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. मातीचा गोळा हातात घेऊन त्यातून आपल्या आवडत्या बाप्पाची मूर्ती साकारताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि समाधान पाहण्यासारखे होते. कुणी बाप्पाची सुंदर सोंड घडवली, तर कुणी मुकुट, कान, डोळे आणि विविध अलंकारांना कल्पक आकार देत गणरायाला मनमोहक रूप दिले.
या कार्यशाळेत केवळ गणपतीची मूर्तीच नव्हे, तर बाप्पाचा आवडता मोदक आणि त्याचे वाहन असलेले ‘उंदीरमामा’ देखील मातीपासून कसे साकारायचे, याचे सखोल व प्रात्यक्षिक स्वरूपात मार्गदर्शन शिक्षक हंसराज गवळे सरांनी विद्यार्थ्यांना केले. मातीला आकार देताना तिचा पोत, प्रमाण, रचना आणि कलात्मक बारकावे यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्यामुळे ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी केवळ मनोरंजनाचा उपक्रम न ठरता कला, संस्कृती, कल्पनाशक्ती आणि पर्यावरणपूरकतेचा सुंदर संगम ठरली.
पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. सुरुवातीला मातीला आकार देताना काही विद्यार्थ्यांच्या हातून बाप्पाचे रूप थोडे वेगळे दिसत होते; मात्र शिक्षकांच्या मार्गदर्शनाने आणि स्वतःच्या कल्पकतेला पंख देत त्यांनी त्याच मातीला हळूहळू गणरायाचे मनोहारी रूप दिले. आपल्या हाताने साकारलेला बाप्पा पाहताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य हेच या कार्यशाळेचे खरे यश ठरले.
‘शिकता शिकता अनुभव घ्यायचा आणि अनुभवातून कला जोपासायची’ या संकल्पनेला साजेसा हा उपक्रम शाळेच्या शैक्षणिक वातावरणात एक वेगळीच रंगत घेऊन आला. मातीशी नाते जोडताना विद्यार्थ्यांना आपल्या पारंपरिक हस्तकलेची ओळख झाली, तर स्वतःच्या हाताने गणरायाची मूर्ती साकारल्याने त्यांच्या सर्जनशीलतेला आणि आत्मविश्वासालाही बळ मिळाले.
या उपक्रमासाठी केंद्रप्रमुख श्री. ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक भास्कर माजगावकर आणि ज्येष्ठ शिक्षक सुधीर गावडे यांचे सहकार्य मिळाले. त्यांच्या सहकार्यामुळे तसेच शिक्षक हंसराज गवळे सरांच्या कल्पक नियोजनामुळे ही मातीकाम कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी एक अविस्मरणीय आणि आनंददायी अनुभव ठरली.
मातीच्या साध्याशा गोळ्याला कल्पनाशक्ती, मेहनत आणि संस्कारांची जोड देत चिमुकल्यांनी साकारलेला हा ‘मातीचा बाप्पा’ त्यांच्या कलागुणांची साक्ष देणारा ठरला. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देतानाच विद्यार्थ्यांच्या मनात ‘आपल्या हाताने काहीतरी निर्माण करण्याचा आनंद’ रुजविणारा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरला.
