कोमसाप सावंतवाडीकडून ‘संत शिरोमणी’ निबंध स्पर्धेच आयोजन

सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडी शाखेकडून मराठी भाषेचे आद्यप्रवर्तक आणि महान पुरस्कर्ते संत ज्ञानेश्वर महाराजांच्या (सप्तशतकोत्तर) ७५१ व्या जयंती निमित्ताने ‘संत शिरोमणी’ निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. इयत्ता आठवी ते दहावीच्या गटासाठी ही स्पर्धा होणार असून सावंतवाडी तालुका मर्यादीत ही स्पर्धा असणार आहे अशी माहिती शाखा अध्यक्ष दीपक पटेकर यांनी दिली. गोळुक अष्टमीच्या निमित्ताने ही स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे.

युवा पिढीला संत ज्ञानेश्वरांचे कार्य व विचार अवगत व्हावे, तरुणाईला लिहिण्यास प्रोत्साहित करून मराठी भाषा वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडीकडून या तालुकास्तरीय शालेय निबंध स्पर्धेच आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता ८ वी ते १० वी साठी ही स्पर्धा होणार असून निबंधाचे विषय १) ज्ञानेश्वरी : मराठी भाषेचे लेणे व २) संत ज्ञानेश्वरांचे जीवनकार्य आणि अगाध ज्ञान असे आहेत. स्पर्धा निःशुल्क स्वरूपाची असून याचा कालावधी दि. १० सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत आहे. २५ सप्टेंबर पर्यंत स्पर्धकांनी आपला निबंध दीपक पटेकर (दीपी), द्वारा फ्रेशमार्ट सुपर मार्केट जि. प. शाळा नंबर ०२ जवळ, नरेंद्र डोंगर रोड, जुना बाजार, सावंतवाडी या पत्त्यावर जमा करायचा आहे. तर अधिक माहितीसाठी दीपक पटेकर 9421237568, विनायक गांवस
9075119473 यांच्याशी संपर्क साधावा.‌

स्पर्धेतील प्रथम क्रमांकास रोख रूपये १ हजार, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक ₹. ७००/-, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक ₹.५००/-सन्मानपत्र, सन्मानचिन्ह तर उत्तेजनार्थ प्रथम ₹.२००/- व उत्तेजनार्थ द्वितीय ₹ २००/- व सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे असून ही बक्षीसे ॲड. नकुल पार्सेकर, प्रा.सुभाष गोवेकर, विनायक गांवस यांनी पुरस्कृत केली आहेत. स्पर्धेच्या नियम व अटी पुढीलप्रमाणे असून निबंध मराठी भाषेतच असावा, निबंधात मांडलेले विचार, योग्य परिचय (प्रस्तावना), मुख्य मुद्दा आणि शेवट (समारोप) अशी रचनाबद्ध मांडणी असणे आवश्यक. शब्दसंख्या किमान ३०० ते ५०० शब्द मर्यादित असावी. निबंध हस्तलिखित व कागदाच्या एकाच बाजूस लिहावा. ही स्पर्धा निःशुल्क असणार असून स्पर्धेचे बक्षीस वितरण कोमसाप सावंतवाडी शाखा आयोजित जिल्हास्तरीय तुतारी कविसंमेलनात केलं जाणार आहे अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे ‌.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page