पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांना चाव्या सुपूर्द करण्यात आल्या
कणकवली प्रतिनिधी
राज्यातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार कटीबद्ध असल्याचे श्री राणे यांनी यावेळी सांगितले.
प्रधानमंत्री जन मन आवास योजना योजनेअंतर्गत ग्रामपंचायत करंजे गावामध्ये 4 घरकुलांना मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी सर्व चारही घरकुले पूर्ण झाली आहेत. सदर योजनेतील लाभार्थी भूमिहीन असल्याने त्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय (PDU) योजनेअंतर्गत गावातील श्रीमती वैजयंती मौर्य, शिवाजी वाळके, विठ्ठल वाळके, श्रीमती निर्मला परब व श्रीमती मयुरी शिरसाठ यांनी घरकुल बांधकामासाठी एकुण ४ आर क्षेत्र बक्षीसपत्राद्वारे उपलब्ध करून दिले आहे. लाभार्थ्यांना सदर जमीन खरेदीसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय (PDU) योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी रु. ३१,३०५ प्रमाणे चार लाभार्थ्यांना एकूण रु. १,२५,२२० इतके अनुदान शासनाकडून देण्यात आले.
तर प्रधानमंत्री जन मन योजनेअंतर्गत प्रत्येक घरकुलाच्या बांधकामासाठी र.रु. २,००,००० रुपये इतके अनुदान शासनाकडुन देण्यात आले आहे. याशिवाय महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGS) अंतर्गत मजुरीपोटी एकुण रु. १,०४,५२०/- इतके अनुदान वितरित करण्यात आले.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत झालेल्या या गृहप्रवेश सोहळ्याच्या वेळी लाभार्थ्यांना चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. तसेच सोलर पंप बसून पाणी सुविधा तसेच लाईट सुविधाही येथे उपलब्ध करण्यात आली आहे. या गृहप्रवेश सोहळ्यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, सभापती हर्षदा वाळके, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, उपसभापती राजेश सावंत, जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे , विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, सरपंच श्रीमती मेस्त्री,ग्रामसेवक ऋतुराज कदम यांच्यासहित इतर उपस्थित होते.
