छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

३१ जुलैला सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन ठिकाणी भव्य शिबिरांचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी दि २९ (जिमाका)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्‍यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय दिनांक २२ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान एका दिवशी “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यभरात दि.२२ जुलै २०२६ पासुन “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाला सुरुवात झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्‍हयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्‍णालय येथे सर्वसामान्‍य जनतेसाठी आरोग्‍य तपासणी व विशेष आरोग्‍य शिबिर अभियानाचा शुभारंभ करुन याची सुरुवात करण्‍यात आली. प्रशासकीय कामकाज अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्याच्या दृष्टीने “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” राबविण्यात येणारआहे.

विविध शासकीय योजनांचा लाभ समाजातील तळागाळातील अंतिम घटकांपर्यंत त्वरित पोहोचविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. दिनांक २२ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत महसूल, आरोग्य, पोलिस, महिला व बालविकास, कृषी, वन, पर्यटन, भूमी अभिलेख, पशुसंवर्धन व दुग्‍धविकास, समाजकल्याण, नगरविकास, ग्रामविकास, परिवहन इ. शासनाच्‍या विविध विभागांमार्फत दिल्‍या जाणा-या लोककल्याणकारी योजनांचा लाभ आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत देण्‍यात येणा-या सेवा देखील संबंधित विभागांकडून नागरिकांना उपलब्ध करून दिल्‍या जाणार आहेत.

जिल्‍हयात “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” अंमलबजावणी करण्याच्‍या अनुषंगाने एकूण ३ विधानसभा मतदारसंघामध्‍ये सदर शिबिरांचे आयोजन दि.३१ जुलै २०२६ रोजी होणार आहे. या अभियान कार्यक्रमासाठी पालकमंत्री नितेश राणे, आमदार सर्वश्री दिपक केसरकर, निलेश राणे,आमदार कुडाळ विधानसभा मतदारसंघ हे आपल्‍या मतदारसंघाच्‍या शिबिर अभियानात स्‍वत: उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. सदर शिबिराचे आयोजन कणकवली विधानसभा मतदारसंघामध्‍ये राधेश्‍याम बॅंक्‍वेट्स अॅन्‍ड लॉन्‍स, जानवली, कणकवली येथे, कुडाळ विधानसभा मतदारसंघामध्‍ये सिध्‍दीविनायक हॉल, कुडाळ येथे तसेच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्‍ये बॅरिस्‍टर नाथ पै सभागृह, नगरपरिषद सावंतवाडी येथे करण्‍यात येणार आहे.

या अभियानाच्‍या नियोजनाबाबत जिल्‍हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सर्व यंत्रणांचा आढावा घेतला. तसेच सर्व उपविभागीय अधिकारी यांनी आपल्‍या उपविभागात मोठ्या प्रमाणावर सदर अभियानाची प्रसिध्‍दी देणेबाबत व अभियान यशस्‍वीरित्‍या राबविण्‍याबाबत मार्गदर्शन केले. या अभियानामध्‍ये जिल्‍ह्यातील पात्र महिला शेतकरी लाभार्थी यांना आवश्‍यक त्‍या कागदपत्रांची पूर्तता करुन अभियान दिवशी शेतकरी दाखले वितरीत करण्‍याची मोहिम राबविण्‍यात येणार आहे. तसेच जिल्‍ह्यातील एकूण ७५८ महसूली गावांचे गावनकाशे भूमि अभिलेख विभागाकडून संबंधित गावाच्‍या ग्राम महसूल अधिकारी यांना देण्‍याबाबतचा विशेष कार्यक्रम सदर प्रसंगी राबविण्‍यात येणार असून या अभियानामध्‍ये जिल्‍हातील सर्व शासकीय विभागाचे अधिकारी सहभागी होणार आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व नागरिक, शेतकरी बंधू-भगिनी, महिला व गरजू घटकांना स्‍वत:च्‍या मतदारसंघातील ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियाना’ मध्‍ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन विविध शासकीय योजनांचा व सेवांचा लाभ घेण्‍याचे आवाहन जिल्हाधिकारी तृप्‍ती धोडमिसे यांनी केले आहे.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page