सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल, वेंगुर्ला येथे ‘पालक दिन’ उत्साहात संपन्न

पालकांचे प्रेम,त्याग,संस्कार आणि मुलांच्या सर्वांगीण जडणघडणीत असलेले अनमोल योगदान याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल,वेंगुर्ला यांच्या वतीने वेंगुर्ला येथील सिद्धिविनायक हॉल येथे ‘पालक दिन’ उत्साहपूर्ण, आनंदी आणि कौटुंबिक वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शैक्षणिक वर्ष २०२६–२७ मधील नव्याने निवड झालेल्या विद्यार्थी परिषदेचा परिचय उपस्थितांना करून देण्यात आला. यानंतर संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद शेख यांचे स्वागत मुख्याध्यापिका मनीषा डिसोझा यांनी केले, तर मुख्याध्यापिका मनीषा डिसोझा यांचे स्वागत शाळेचे ज्येष्ठ शिक्षक गजानन पालयेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.
कार्यक्रमाच्या विशेष अतिथी म्हणून प्रशालेच्या पालक गौरी सामंत प्रभूखानोलकर उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांसाठी विकसित करण्यात आलेल्या बालोद्यानासाठी त्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त व मोलाच्या सहकार्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद शेख व मुख्याध्यापिका मनीषा डिसोझा यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे आणि शाळेप्रती असलेल्या योगदानाचे कौतुक केले.
त्यानंतर उपाध्यक्ष इर्शाद शेख, मुख्याध्यापिका मनीषा डिसोझा तसेच विशेष अतिथी गौरी सामंत प्रभूखानोलकर यांच्या उपस्थितीत शाळेच्या देणगीदारांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या आजी-आजोबांचेही शाळेतर्फे गुलाबपुष्प देऊन मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.
सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात नर्सरी ते सीनिअर केजीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या आकर्षक स्वागतगीताने झाली. पूर्व-प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी आपल्या गोड गीतांमधून आई-वडिलांप्रती असलेले प्रेम, जिव्हाळा आणि कृतज्ञता भावपूर्ण पद्धतीने व्यक्त केली.
पालकांप्रती आदर व कृतज्ञतेची भावना जोपासण्यासाठी प्रत्येक वर्गात स्वहस्ते शुभेच्छापत्र तयार करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली शुभेच्छापत्रे आपल्या पालकांना भेट देऊन त्यांच्याविषयीचा सन्मान व्यक्त केला.
कार्यक्रमातील मनोरंजन विभागात पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. गीत,एकल व युगल नृत्य, समूह नृत्य आणि विविध सांस्कृतिक अशा पालकांच्या सादरीकरणाने कार्यक्रमात रंगत आणली. पालकांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले.यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी तनिष कुबल व विद्यार्थी सचिव श्रेया मराठे यांनी आपल्या मनोगतातून पालकांविषयीची कृतज्ञता व्यक्त केली. विशेष अतिथी गौरी सामंत प्रभूखानोलकर यांनी पालकांना पालक दिनाच्या शुभेच्छा देत मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासात पालकांच्या संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले. मुख्याध्यापिका मनीषा डिसोझा यांनीही पालकांना शुभेच्छा देत शाळा व पालक यांच्यातील सुसंवाद आणि सहकार्य हे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. उपाध्यक्ष इर्शाद शेख यांनी पालकांना पालकदिनाच्या शुभेच्छा दिल्या. शाळेचे ज्येष्ठ शिक्षक गजानन पालयेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
प्रेम, आपुलकी, कृतज्ञता आणि संस्कारांचा संदेश देणारा हा ‘पालक दिन’ विद्यार्थी, पालक आणि उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला.
यावेळी प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page