व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी नगरसेवक मंदार शिरसाठ यांचे जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमीसे यांना निवेदन..!
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘गणेशोत्सव’ हा सण अत्यंत पवित्र, उत्साहाचा आणि सर्वात मोठा सण म्हणून साजरा केला जातो. या महापर्वासाठी मुंबई, पुणे आणि इतर शहरांमधून लाखो चाकरमानी आपल्या मूळ गावी दाखल होतात. या सणासुदीच्या काळात घराघरांमध्ये पाहुण्यांची रेलचेल असते, तसेच महाप्रसाद आणि विविध पक्वान्ने बनवण्यासाठी प्रत्येक घरात गॅस सिलिंडरचा वापर नेहमीपेक्षा प्रचंड प्रमाणात वाढतो.
मात्र, सध्या ग्रामीण भागात गॅस कंपन्यांकडून लागू असलेला ‘२५ दिवसांचा गॅस बुकिंगचा नियम’ ऐन सणासुदीत स्थानिक नागरिकांसाठी आणि चाकरमान्यांसाठी अत्यंत अडचणीचा व डोकेदुखीचा ठरणार आहे. ही गंभीर समस्या ओळखून हा नियम तात्पुरता शिथिल करण्यात यावा आणि घरगुती गॅस सिलिंडर पुरवठा सुलभ करावा, अशी आक्रमक व न्याय्य मागणी शिवसेना नगरसेवक श्री. मंदार श्रीकृष्ण शिरसाट यांनी सिंधुदुर्गच्या माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे एका विस्तृत निवेदनाद्वारे केली आहे.
ऐन गणेशोत्सवाच्या काळात गॅसचा तुटवडा निर्माण होऊन लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाने गॅस कंपन्यांशी तातडीने समन्वय साधून योग्य व आगाऊ नियोजन (Advance Planning) करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रशासनाला नियोजनासाठी पुरेसा वेळ मिळावा, याच उद्देशाने युवासेनेने गणेशोत्सवाच्या साधारण ४५ दिवस आधीच हे महत्त्वाचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या या निवेदनात युवासेनेने प्रामुख्याने खालील दोन महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत:
१) घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगच्या नियमात तात्पुरती सवलत मिळावी:सध्या गॅस कंपन्यांच्या नियमांनुसार एकदा सिलिंडर घेतल्यानंतर पुढील २५ दिवस दुसरे बुकिंग करता येत नाही. परंतु, गणेशोत्सवाच्या काळात घरात माणसांची संख्या वाढल्याने गॅस लवकर संपतो. त्यामुळे केवळ गणेशोत्सवाच्या कालावधीत, म्हणजेच गणेश चतुर्थीच्या १५ दिवस आधी आणि चतुर्थी संपल्यानंतरचे १५ दिवस (असा एकूण १ महिना), घरगुती सिलिंडरची ही २५ दिवसांची जाचक अट तात्पुरती शिथिल करण्यात यावी, जेणेकरून नागरिकांना गरजेनुसार दुसरा सिलिंडर त्वरित बुक करता येईल.
२) व्यावसायिक सिलिंडरचा (Commercial LPG) पुरवठा सुरळीत ठेवून अतिरिक्त साठा उपलब्ध करावा:उत्सवाच्या या काळात जिल्ह्यातील स्थानिक हॉटेल्स, खानावळी, सणावरांचे उपहारगृह, बेकरी, मिठाईची दुकाने आणि इतर व्यावसायिक दुकानदार यांच्याकडे ग्राहकांची आणि चाकरमान्यांची मोठी गर्दी असते. साहजिकच या काळात व्यावसायिक सिलिंडरची मागणी कमालीची वाढते. ऐन सणात बाजारात व्यावसायिक सिलिंडरचा (१९ किलो) तुटवडा भासू नये यासाठी गॅस कंपन्यांना जिल्ह्यात अतिरिक्त साठा (Buffer Stock) आधीच उपलब्ध करून ठेवण्याचे आदेश प्रशासनाने द्यावेत. यामुळे स्थानिक व्यावसायिक आणि व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळेल व त्यांचा व्यवसाय सुरळीत चालेल.
स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांना दिलासा देण्याची विनंती:”शासनाने आणि जिल्हा प्रशासनाने या दोन्ही मागण्यांचा अत्यंत सकारात्मक व गांभीर्याने विचार करावा. गणेशोत्सव हा कोकणवासीयांच्या अस्मितेचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. या सणात कोणत्याही कुटुंबाला गॅसअभावी अडचणीचा सामना करावा लागू नये, हीच युवासेनेची भूमिका आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये तातडीने हस्तक्षेप करून जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक, चाकरमानी आणि व्यापारी वर्गाला मोठा दिलासा द्यावा,” अशी आग्रही विनंती नगरसेवक मंदार शिरसाट यांनी या निवेदनात केली आहे. या संदर्भात प्रशासनाकडून सकारात्मक सहकार्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी नगरसेवक मंदार शिरसाठ,नगरसेवक संतोष शिरसाठ, पंचायत समिती सदस्य योगेश धुरी,अमित राणे,शैलेश काळप,संदीप म्हाडेश्वर,गुरु गडकर उपस्थित होते
