माजी उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ आगाराला निवेदन
:कुडाळ परिसरातील नियमित प्रवासी, नोकरदार आणि विद्यार्थ्यांची एसटी बसच्या कोलमडलेल्या वेळापत्रकामुळे प्रचंड गैरसोय होत आहे. या ढिसाळ कारभाराची गंभीर दखल घेत कुडाळ नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष श्री. मंदार श्रीकृष्ण शिरसाट यांच्या माध्यमातून शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कुडाळ आगार व्यवस्थापकांना धारेवर धरत एक परिपूर्ण निवेदन सादर केले
कुडाळ बसस्थानकाची बिघडलेली स्थिती न सुधारल्यास सर्व प्रवाशांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या निवेदनाद्वारे प्रशासनाला देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कुडाळ आगाराच्या बसफेऱ्यांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. अनेक महत्त्वाच्या फेऱ्या (उदा. कुडाळ-पणजी फेरी, शालेय व ग्रामीण भागातील फेऱ्या) वेळेवर सुटत नसल्याने नोकरदार वर्ग वेळेवर कामावर पोहोचू शकत नाही, तर विद्यार्थ्यांना शाळेला उशीर होत आहे. अनेक फेऱ्या अचानक रद्द केल्या जात आहेत, तर काही बसेस थेट दीड ते दोन तास उशिराने धावत आहेत.
तसेच बसेसना सीएनजी भरण्यासाठी ओरोस-खैरवाडी येथे जावे लागत असल्यामुळे वेळेचा मोठा अपव्यय होत असून, याचा नाहक फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे.
आगामी गणेशोत्सव काही दिवसांवर आला असून, या काळात चाकरमानी व स्थानिक प्रवाशांची गर्दी प्रचंड वाढणार आहे. जर आत्ताच ही परिस्थिती असेल तर सणासुदीच्या काळात प्रवाशांचे अतोनात हाल होतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.युवासेनेच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत:
१. वेळापत्रक पूर्ववत करा: सर्व कोलमडलेल्या बसफेऱ्या, विशेषतः कुडाळ-पणजी आणि ग्रामीण/शालेय फेऱ्या त्वरित निर्धारित वेळेत सुरू करण्यात याव्यात.
२. कर्मचाऱ्यांचे योग्य नियोजन: वाहक-चालकांच्या कमतरतेवर तात्पुरती किंवा कायमस्वरूपी मात करून बसेस नियमित चालवाव्यात.
३. सीएनजी वेळेचे नियोजन: बसेसचा सीएनजी भरण्यासाठी जाणारा वेळ आणि फेऱ्या अशा प्रकारे मॅनेज कराव्यात, जेणेकरून प्रवासी फेऱ्यांवर त्याचा परिणाम होणार नाही.
४. गणेशोत्सव विशेष नियोजन: आगामी गणेशोत्सवासाठी जादा गाड्यांचे आणि अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे चोख नियोजन आत्तापासूनच जाहीर करण्यात यावे.
कुडाळ बसस्थानक हे जिल्ह्याचे मध्यवर्ती केंद्र आहे. त्यामुळे प्रशासनाने या मागण्यांची दखल घेऊन परिस्थिती सुधारण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अन्यथा होणाऱ्या तीव्र आंदोलनाची व कायदा-सुव्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी एसटी प्रशासनाची राहील, असा स्पष्ट इशारा श्री. मंदार शिरसाट व शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे.
यावेळी शिवसेना उपजिल्हप्रमुख अमर सावंत, पंचायत समिती सदस्य योगेश धुरी,तालुका समन्वयक बबन बोभाटे, बाळा पावसकर,अमित राणे, धीरेंद्र चव्हाण,शैलेश काळप,गुरु गडकर
