माणगावमध्ये वाहतूक कोंडीला जबाबदार कोण?; योगेश धुरींचा सवाल
माणगाव (प्रतिनिधी)
माणगाव परिसरात वाढत्या वाहनांची संख्या आणि विस्कळीत वाहतूक व्यवस्थेमुळे वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. मुख्य रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागत असून नागरिक, वाहनचालक तसेच विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
विशेषतः बाजारपेठ व मुख्य चौक परिसरात वाहतूक कोंडी होत असताना वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस कर्मचारी किंवा वाहतूक व्यवस्था दिसून येत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
या परिस्थितीवर पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. “माणगावमध्ये वारंवार ट्राफिक जाम होत असताना वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस व्यवस्था का दिसत नाही? नागरिकांना वाहतूक कोंडीत तासन्तास अडकून पडावे लागणार का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
माणगाव हे परिसरातील महत्त्वाचे बाजारपेठ व दळणवळणाचे केंद्र असून विविध गावांमधून नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. त्यामुळे गर्दीच्या वेळेत वाहतूक पोलिसांची किंवा स्थानिक पोलिसांची नियुक्ती करून वाहतूक सुरळीत करणे आवश्यक आहे.
वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रशासनाने तातडीने योग्य नियोजन करावे आणि गर्दीच्या वेळेत पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी योगेश धुरी यांनी केली आहे.
