रुग्णालयात पेशंटना मिळणाऱ्या तकलादू आरोग्य सेवेबाबत विचारणा करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना चक्क “बॅनर” द्वारे धमकी..!
हॉस्पिटलचे डीन “लोकसेवक आहेत की मालक”?
प्रसाद गावडेंचा खरमरीत सवाल
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सिंधुदुर्गच्या भोंगळ कारभाराबाबत रोज अनेक बाबी समोर येत असून डीन मनमानी पद्धतीने कारभार हाकत आहेत. अधिष्ठातांच्या या आडमुठ्या धोरणामुळे जिल्ह्यासाठी मंजूर झालेले आयुष हॉस्पिटल मागील वर्षभर सुरू होऊ शकले नाही हे उदाहरण ताजे असतानाच आता भेटण्यासाठी येणाऱ्या अभ्यंगतांना “गुन्हे दाखल करू” असा संदेश देत धमकावण्याचे प्रकार सुरु केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडेंनी केला आहे. आपण “लोकसेवक आहात की मालक” असा खरमरीत सवाल करत जनतेसमोर खुलासा सादर करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. या पत्रात रुग्णालयात जिल्ह्यातील रुग्णांना मिळणाऱ्या तकलादू आरोग्य सेवेबाबत तक्रारी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना भीती घालण्यासाठी किंवा ते येऊच नयेत ह्यातून सुटका करून घेण्यासाठी डीननी शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी भारतीय न्याय संहिता व दंड संहितेतील असलेल्या तरतुदी बँनर द्वारे दालनाच्या बाहेर लावून सर्वसामान्य नागरिकांना धमकावण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप गावडेंनी केला आहे. एकीकडे रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळत नाही म्हणून रुग्ण “रेफर” करायला लाज म्हणून “डिस्चार्ज” दाखवले जातात अशा तक्रारी असताना खुलासा म्हणून पेशंट किंवा पेशंटशी संबंधित नातेवाईकांकडून तक्रारी प्राप्त नाहीत असे कळवले जाते तर दुसरीकडे नागरिकांना पोलिसांची भीती घालून वेळ मारून नेण्याचे काम अधिष्ठाता करत असल्याचा आरोप गावडेंनी करत अशा पद्धतीचा फलक शासकीय कार्यालयात व दालनाबाहेर लावण्यासाठी कोणत्या शासन निर्णय व परिपत्रकांचा आधार घेतला याचा खुलासा अधिष्ठतांनी सिंधुदुर्ग वासियांना द्यावा अशी मागणी पत्रातून केली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने “सविनय कायदेभंग” आंदोलन करण्याचा इशारा देत सदरचा बॅनर हटवावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांनी अधिष्ठतांकडे पत्राद्वारे केली असून आपण लोकसेवक आहात की मालक असा खरमारीत सवाल देखील पत्रातून केला आहे. वरिष्ठ कार्यालयाच्या परवानगीशिवाय व शासन निर्णय परिपत्रकांशिवाय अशा पद्धतीचा बॅनर दालनाबाहेर लावणे हीच गोष्ट मुळात बेकायदेशीर असून शिस्त अभंगाच्या कारवाईस प्राप्त असल्याचे देखील गावडे यांनी पत्रात म्हटले आहे.
