तेर्सेबांबर्ड ग्रामपंचायतीचा ‘दशावतार महोत्सव २०२६;

शेतकरी, महिला, युवक आणि विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन; २६ ते २८ ऑक्टोबरदरम्यान रंगणार महोत्सव

कुडाळ प्रतिनिधी :
ग्रामपंचायत तेर्सबांबर्डे वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ‘दशावतार महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. दि. २६ ते २८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक आणि सामाजिक उपक्रमांनी हा महोत्सव रंगणार आहे. ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, सोमवार दि. २६ ऑक्टोबर रोजी सकाळी सत्यनारायणाची महापूजा, त्यानंतर महाआरती, महाप्रसाद आणि दुपारच्या सत्रात भजने आयोजित करण्यात आली आहेत. याच दिवशी गाय, म्हैस, रेडा व बैल सजावट स्पर्धा तसेच सायंकाळी हरीपाठाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळाचा पारंपरिक नाट्यप्रयोग होणार असून, या माध्यमातून कोकणच्या लोककलेचा जागर केला जाणार आहे.मंगळवार दि. २७ ऑक्टोबर रोजी महिलांसाठी हळदी-कुंकू व विविध स्पर्धा गाव मर्यादित आयोजित करण्यात आल्या आहेत. तसेच ‘स्मार्ट वहिनी’ स्पर्धेच्या माध्यमातून महिलांच्या कौशल्याला व सर्जनशीलतेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांसाठी आकर्षक बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय प्रसिद्ध नृत्यकलाकार समर्थ गवंडी यांचा नृत्याविष्कार आणि दशावतार जीवनपटावर आधारित नृत्य हे महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. ‘मिमिक्री शो’ देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.

बुधवार दि. २८ ऑक्टोबर रोजी युवकांसाठी ‘युवाई’ कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिली ते चौथी आणि पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी फणी गेम्स स्पर्धा होणार आहे. दुपारच्या सत्रात पुरुषांसाठी विविध स्पर्धा, तर रात्री संकल्प क्रिएशन डान्स अकॅडमीच्या वतीने नृत्यरंग कार्यक्रम सादर केला जाणार आहे.

या महोत्सवाच्या माध्यमातून गावातील धार्मिक परंपरा, दशावतार लोककला, महिला सक्षमीकरण, युवकांचा सहभाग आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीकडून करण्यात येत आहे. स्थळ जि.प.शाळा नं १ पटांगण ग्रामपंचायत तेर्सेबांबर्डे नजिक पार पडणार आहे तरीही ग्रामस्थांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन ग्रामपंचायत तेर्सेबांबर्डे व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे

ग्रामस्थांच्या सहभागातून महोत्सव उत्साहात पार पडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page