पीळदार शरीरयष्टींचा जलवा,युवकांचा उत्साह.!
सावंतवाडी प्रतिनिधी
पीळदार शरीरयष्टी, दमदार स्नायूंचे प्रदर्शन आणि खेळाडूंच्या मेहनतीला मिळालेली दाद अशा उत्साही वातावरणात सावंतवाडीत बहुप्रतीक्षित ‘भाजपा श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेला दिमाखात सुरुवात झाली. भाजपा सिंधुदुर्ग आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या स्पर्धेच्या माध्यमातून स्थानिक युवा शरीरसौष्ठवपटूंना आपले कौशल्य आणि शारीरिक सामर्थ्य दाखविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
युवकांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी, आरोग्याबाबत जागरूकता वाढावी आणि तंदुरुस्त जीवनशैलीचा स्वीकार व्हावा, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट इंडिया’ संकल्पनेला अनुसरून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. केवळ शरीर कमावणे नव्हे, तर नियमित व्यायाम, शिस्त आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व युवकांपर्यंत पोहोचविण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली, भाजपा युवा मोर्चाचे सावंतवाडी अध्यक्ष हितेन नाईक आणि आंबोली अध्यक्ष विनेश तावडे यांच्या पुढाकारातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. युवकांमधील क्रीडागुणांना प्रोत्साहन देतानाच शरीरसौष्ठव क्षेत्रात नव्या खेळाडूंना संधी मिळावी, हा या आयोजनामागील प्रमुख हेतू आहे.
या उद्घाटन सोहळ्याला सावंतवाडीचे आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, क्रीडा सभापती आनंद नेवगी, नगरसेवक तथा भाजपा प्रवक्ते ॲड. सिद्धार्थ भांबुरे, माजी उपनगराध्यक्ष राजू बेग, भाजपाचे ज्येष्ठ नेते मनोज नाईक, नगरसेविका सुकन्या टोपले, भाजपाचे सोशल मीडिया प्रमुख केतन आजगावकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
युवकांच्या शारीरिक क्षमतेला प्रोत्साहन, व्यायाम संस्कृतीचा प्रसार आणि नवोदित शरीरसौष्ठवपटूंना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने आयोजित ‘भाजपा श्री’ स्पर्धेमुळे सावंतवाडीत फिटनेस आणि शरीरसौष्ठव क्षेत्राला नवी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
