“अखेर” दिलेल्या शब्दाची दुसऱ्यांच दिवशी पूर्तता;जि.प.सदस्य विक्रांत सावंत यांनी पाळला शब्द

चराटा ग्रामस्थ,विद्यार्थी, शिक्षक यांच्याकडून कौतुकचा वर्षाव

सावंतवाडी प्रतिनिधी
चराठा, माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचे भाजप युवा नेते विक्रांत सावंत यांनी चराठा येथील पी. एम. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेला दिलेल्या शब्दाची अवघ्या दुसऱ्याच दिवशी पूर्तता केली आहे. शाळेतील विजेच्या समस्येवर तातडीने मात करण्यासाठी त्यांनी आवश्यक क्षमतेचा इन्व्हर्टर संच शाळेला सुपूर्द केला आहे. सावंत यांच्या या वेगवान तत्परतेमुळे विद्यार्थी, शिक्षक आणि चराठा ग्रामस्थांमधून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

चराठा येथील या आंतरराष्ट्रीय शाळेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने डिजिटल पद्धतीने अध्यापन केले जाते. मात्र, या भागात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणात मोठे अडथळे येत होते. नुकत्याच झालेल्या एका शालेय कार्यक्रमादरम्यान मुख्याध्यापिका व शिक्षकांनी या समस्येकडे विक्रांत सावंत यांचे लक्ष वेधले होते. ही अडचण समजून घेताच सावंत यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी पुढील आठ दिवसांत इन्व्हर्टर उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली होती.

सामान्यतः लोकप्रतिनिधींकडून केवळ घोषणा केल्या जातात, अशी जनभावना असताना विक्रांत सावंत यांनी मात्र थेट कृतीवर भर दिला. आठ दिवसांचा वेळ मागितलेला असताना त्यांनी अवघ्या २४ तासांच्या आत स्वतः शाळेत जाऊन इन्व्हर्टर सुपूर्द केला व तो तातडीने कार्यान्वित करून घेतला.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये ही आमची प्राथमिकता असून शिक्षण क्षेत्रातील मूलभूत सुविधांसाठी आपण नेहमीच पाठीशी राहू, असा विश्वास यावेळी विक्रांत सावंत यांनी व्यक्त केला. दिलेला शब्द पाळणारा लोकप्रतिनिधी अशा शब्दांत शाळा व्यवस्थापन, शिक्षक आणि ग्रामस्थांनी त्यांचे मनापासून आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page