बांदा प्रतिनिधी
“मराठा हे केवळ एक नाव नसून ते एक व्रत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वसा आणि वारसा जपत समाजाने प्रगतीची नवी शिखरे पादाक्रांत केली पाहिजेत. समाजातील गुणवंतांच्या यशाचा आदर्श नव्या पिढीने डोळ्यांसमोर ठेवावा. तरुणांनी स्पर्धा परीक्षांकडे वळून प्रशासकीय सेवेत आपला ठसा उमटवावा. समाजातून गुणवत्तापूर्ण अधिकारी निर्माण होण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची नितांत गरज आहे,” असे प्रेरणादायी प्रतिपादन प्रा. रुपेश पाटील यांनी केले.
बांदा मराठा समाजाच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करून समाजाचा नावलौकिक उंचावणाऱ्या गुणवंतांचा गौरव सोहळा नट वाचनालयाच्या नाडकर्णी सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. पाटील बोलत होते.
दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्यांनी नेमके कोणत्या दिशेने वाटचाल करावी, कोणत्या क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध आहेत, याबाबत योग्य वेळी मार्गदर्शन मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी समाजाच्या वतीने महिन्यातून किमान एकदा करिअर मार्गदर्शनाचा उपक्रम राबविण्यात यावा. स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत. केवळ शैक्षणिक पदव्या मिळविण्यापेक्षा समाजाच्या विकासात योगदान देणारे सक्षम, कर्तृत्ववान अधिकारी घडविण्याचे ध्येय आपण ठेवले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सहा गुणवंतांचा कर्तृत्वगौरव!
या सोहळ्यात एम.एस्सी. रसायनशास्त्र परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणारी अंजली गोविंद सावंत, डॉक्टर पदवी प्राप्त केलेली अर्पिता अविनाश पंडित, लोकमान्य मल्टिपर्पजचा ‘बेस्ट मॅनेजर’ पुरस्कार मिळविणारे तुळशीदास गवस, पोलीस उपनिरीक्षक सौ. श्रद्धा भानुदास दळवी, सौ. दीक्षा दिनेश नाईक आणि विशेष यश संपादन करणारा नैतिक नीलेश मोरजकर या सहा गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
महिला नेतृत्वाचाही गौरव; ज्येष्ठ नागरिक मंचाच्या विजेत्यांचा सत्कार!
यावेळी बांदा मराठा समाजाच्या नवनियुक्त महिला कार्यकारिणीचा जाहीर सत्कार करून त्यांच्या आगामी सामाजिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच ज्येष्ठ नागरिक विकास मंचाच्या निवडणुकीत यश संपादन केलेल्या सहा सदस्यांचाही गौरव करण्यात आला. गुणवंतांच्या सन्मानासोबतच महिला नेतृत्व आणि ज्येष्ठांच्या कार्यकर्तृत्वाला मिळालेली ही दाद सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरली.
कार्यक्रमाला गुगल कंपनीत उच्च पदावर कार्यरत असलेले प्रसाद शेटकर, मराठा समाजाचे माजी अध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत, उपसरपंच रत्नाकर आगलावे, माजी सभापती शीतल राऊळ, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सावंत, महिला अध्यक्ष सौ. लक्ष्मी सावंत, मराठा समाजाचे अध्यक्ष परिमल सावंत यांच्यासह प्रा. रुपेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मान्यवरांचे स्वागत परिमल सावंत आणि उपाध्यक्ष विनोद सावळ यांनी केले. यावेळी बाळू सावंत, प्रसाद शेटकर आणि परिमल सावंत यांनी मनोगते व्यक्त केली. सचिव सीताराम गावडे यांनी प्रास्ताविक केले. राकेश परब यांनी सूत्रसंचालन केले, तर भूषण सावंत यांनी आभार मानले.
गुणवंतांचा सन्मान म्हणजे नव्या स्वप्नांना मिळालेली भरारी!
समाजातील गुणवंतांच्या कर्तृत्वाचा गौरव करून त्यांच्या यशातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, विद्यार्थ्यांना शिक्षण आणि करिअरच्या नव्या वाटा समजाव्यात तसेच सामाजिक एकोपा अधिक बळकट व्हावा, या उदात्त हेतूने आयोजित करण्यात आलेला हा सोहळा प्रेरणादायी ठरला. गुणवंतांच्या यशाचा जागर आणि नव्या पिढीच्या स्वप्नांना मिळालेली दिशा, अशा उत्साहपूर्ण वातावरणात या गौरव सोहळ्याची सांगता झाली. यावेळी समाजबांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
