ज्ञान मोठे करते, पण संस्कार महान बनवतात’; प्रा.रुपेश पाटील यांचे प्रतिपादन

‘कुठे हरपले संस्कार?’ व्याख्यानातून विद्यार्थ्यांना संस्कारांची प्रेरणादायी शिकवण

शिरपूर (प्रतिनिधी)
“शालेय जीवनात मिळालेले संस्कार हेच भविष्यातील व्यक्तिमत्त्वाचा भक्कम पाया घडवतात. राम, कृष्ण, अर्जुन यांसारख्या महान विभूतींनाही बालवयात मिळालेल्या संस्कारांनी त्यांच्या जीवनाला दिशा दिली. त्यामुळे जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ ज्ञान नव्हे, तर सुयोग्य संस्कारांची शिदोरीही तितकीच आवश्यक आहे,” असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी केले.

आर.सी. पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, भोरखेडा, ता. शिरपूर, जि. धुळे येथे संस्थेचे मुख्य आश्रयदाते स्वर्गीय पप्पाजी उर्फ रसिकलाल चुनीलाल पटेल यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘कुठे हरपले संस्कार’ या विषयावरील प्रेरणादायी व्याख्यानात प्रा. रुपेश पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य सी. एन. पाटील होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे पर्यवेक्षक एस. डी. पाटील यांनी प्रास्ताविकातून प्रा. रुपेश पाटील यांचा परिचय करून दिला. त्यानंतर प्रा. पाटील यांनी आपल्या ओजस्वी आणि प्रभावी वक्तृत्वातून विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत संस्कार म्हणजे काय, संस्कारांची गरज का आहे आणि संस्कारांची शिदोरी जीवनाला कशी दिशा देते, याचे अत्यंत मार्मिक विवेचन केले.

*प्रेरणागीतांतून संस्कारांची पेरणी, कृतीतून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग!*

प्रा. रुपेश पाटील यांच्या व्याख्यानाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ शब्दांचे मार्गदर्शन नव्हे, तर कृतीयुक्त प्रेरणागीत, संवाद आणि प्रसंगनिष्ठ उदाहरणांमधून विद्यार्थ्यांच्या मनाला थेट भिडणारा संस्कारांचा जागर. विविध प्रेरणागीते सादर करताना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यामुळे संपूर्ण सभागृहात उत्साह, ऊर्जा आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले.

रामायणातील आदर्श, महाभारतातील जीवनमूल्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यनिर्मितीचा इतिहास तसेच भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या प्रेरणादायी घटनांचे दाखले देत प्रा. पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेम, कर्तव्यभावना, मातृ-पितृभक्ती, गुरुजनांविषयी आदर आणि सामाजिक बांधिलकीची बीजे रुजविली.

“संस्कार हे पुस्तकातील धडे नसतात; ते आपल्या आचरणातून जगायचे असतात. ज्ञान माणसाला मोठे करते, पण संस्कार त्याला महान बनवतात,” हा संदेश त्यांच्या प्रभावी मांडणीतून विद्यार्थ्यांच्या मनावर ठसला.

प्रा. रुपेश पाटील यांच्या ओघवत्या वाणीने, प्रसंगनिष्ठ उदाहरणांनी आणि प्रेरणादायी शैलीने विद्यार्थी अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. अत्यंत तन्मयतेने विद्यार्थ्यांनी संपूर्ण व्याख्यानाचा लाभ घेतला.

*प्राचार्यांच्या हस्ते प्रा. रुपेश पाटील यांचा सत्कार*

यावेळी विद्यालयाचे प्राचार्य सी. एन. पाटील यांच्या हस्ते प्रा. रुपेश पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास प्राचार्य सी. एन. पाटील, पर्यवेक्षक एस. डी. पाटील यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वर्गीय पप्पाजींच्या स्मृतिदिनाला वाहिलेली ही संस्कारांची आदरांजली विद्यार्थ्यांच्या मनात प्रेरणेची ज्योत पेटवून गेली; आणि ‘कुठे हरपले संस्कार?’ या प्रश्नासोबतच ‘संस्कारांची वाट पुन्हा कुठून धरायची?’ याचे उत्तरही विद्यार्थ्यांना मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page