गोठोसमध्ये चार दिवस दीपोत्सवाची धूम! १४ व्या वर्षी दीपावली महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल…

मा.श्री. प्रकाशजी मोर्ये मित्र मंडळ गोठोस आयोजित…

गोठोस प्रतिनिधी
मा. श्री. प्रकाशजी मोर्ये मित्र मंडळ, गोठोस यांच्या वतीने यंदा १४ व्या वर्षी भव्य दीपावली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, ८ नोव्हेंबर ते बुधवार, ११ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत विविध सांस्कृतिक, मनोरंजनात्मक आणि पारंपरिक कार्यक्रमांची मेजवानी गोठोसवासीयांसह परिसरातील नागरिकांना अनुभवता येणार आहे.

या महोत्सवाचा शुभारंभ रविवार, ८ नोव्हेंबर रोजी होणार असून सकाळी ९ वाजता रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ८.३० वाजता श्री भावई देवी समूह नृत्य, रात्री १० वाजता रेकॉर्ड डान्स स्पर्धा आणि रात्री ११ वाजता रस्सीखेच स्पर्धा रंगणार आहे.

सोमवार, ९ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजता ‘खेळ पैठणीचा’ हा महिलांसाठी विशेष कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर रात्री १०.३० वाजता अहिल्याबाई धनगर समाज मंडळ, गोठोस यांचा गजा नृत्याचा कार्यक्रम सादर होणार आहे.

मंगळवार, १० नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता ओंकार परब डान्स अकॅडमीच्या वतीने भव्य ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे. तर बुधवार, ११ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता सिंधुदुर्गातील दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळाचा दणदणीत दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे.

या दीपावली महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गोठोस गावातील ग्रामस्थांचा मंडळाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

सर्व कार्यक्रम विठ्ठल मंदिराजवळ, गोठोस येथे पार पडणार असून या चार दिवसीय दीपावली महोत्सवाचा नागरिकांनी, महिलांनी आणि युवकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक मा. श्री. प्रकाशजी मोर्ये मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : अजय राऊळ – ८८८८५७८५१८, निलेश कदम – ९१६८४७६३२६.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page