१३ वर्षीय अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या आरोपाप्रकरणी;६१ वर्षीय दुकानदार ताब्यात

बांदा पोलिसांची कारवाई; न्यायालयाकडून दोन दिवसांची पोलीस कोठडी

सावंतवाडी प्रतिनिधी
बांदा पंचक्रोशीतील एका गावात १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून ६१ वर्षीय किराणा दुकानदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जयदेव विठ्ठल म्हाडगुत असे संशयिताचे नाव आहे. मे महिन्यानंतर दोन वेगवेगळ्या प्रसंगी हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. मुलीने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितल्यानंतर नातेवाईकांनी बांदा पोलिसांत तक्रार दाखल केली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित संशयिताचे गावात किराणा दुकान आहे. मे महिन्यात अल्पवयीन मुलगी काही वस्तू घेण्यासाठी दुकानात गेली होती. त्यावेळी ती एकटी असल्याचा फायदा घेत संशयिताने तिला दुकानात बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

यानंतर सुमारे पंधरा दिवसांपूर्वी पुन्हा असाच प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनांनंतर मुलीच्या वागण्यात बदल जाणवू लागला. घरातील व्यक्तींनी तिला दुकानात जाण्यास सांगितल्यानंतर ती घाबरत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर आईने विश्वासात घेऊन विचारणा केली असता मुलीने घडलेला प्रकार सांगितला.

माहिती मिळताच नातेवाईकांनी बांदा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संशयिताविरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले.

दरम्यान, संशयिताला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बांदा पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page