ॲड.रुजूल पाटणकर;मुलांच्या उज्वल भविष्यासाठी या सुविधेचा लाभ घ्यावा
सावंतवाडी प्रतिनिधी
मुलांच्या चेहऱ्यावर उमलणारे हास्य, त्यांच्या बोबड्या बोलांमधून उमटणारे भावविश्व आणि त्यांच्या छोट्याशा जगातील प्रत्येक हालचाल ही पालकांसाठी आनंदाची पर्वणी असते. मात्र काही मुलांच्या विकासाच्या प्रवासात संवाद, सामाजिक वर्तन, संवेदनशीलता आणि शिकण्याच्या प्रक्रियेत काही वेगळेपणा जाणवतो. अशा मुलांना योग्य वेळी योग्य आधार, शास्त्रशुद्ध उपचार आणि संवेदनशील मार्गदर्शन मिळणे अत्यंत गरजेचे असते. याच सामाजिक जाणिवेतून स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे चेअरमन ॲड. रुजूल पाटणकर यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला असून, कोलगाव येथील स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये ऑटिझम व संबंधित विकासात्मक अडचणी असलेल्या मुलांसाठी प्रशस्त थेरपी लॅब उभारण्यात आली आहे.
या सुविधेच्या माध्यमातून गरजू मुलांना तज्ज्ञ थेरपिस्टच्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने थेरपी उपलब्ध करून देण्यात येत असून, जिल्ह्यातील पालकांनी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ॲड. रुजूल पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत केले.
यावेळी बोलताना ॲड. पाटणकर यांनी ऑटिझमविषयी समाजामध्ये असलेल्या गैरसमजांवरही प्रकाश टाकला. ऑटिझम हा संसर्गजन्य आजार नसून मेंदूच्या विकासाशी संबंधित न्यूरो-विकसनात्मक स्थिती आहे. त्याची लक्षणे बालपणात दिसून येऊ शकतात; मात्र प्रत्येक मुलामध्ये त्याचे स्वरूप आणि तीव्रता वेगवेगळी असते. त्यामुळे प्रत्येक मुलाकडे त्याच्या वैयक्तिक गरजा आणि क्षमतांचा विचार करून पाहणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
