बेकायदेशीर विक्री करणाऱ्या टोळीचा वनविभागाने केला पर्दाफाश:कुडाळ एसटी डेपो येथे तिघांना अटक

१२ वाघनखांच्या विक्रीसाठी अडीच लाखांचा व्यवहार;दोघांना दोन दिवसांची वनकोठडी

कुडाळ : वन्यप्राण्यांच्या अवयवांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या टोळीचा वनविभागाने पर्दाफाश केला आहे. वाघनखे विक्री करण्यासाठी अडीच लाख रुपयांचा व्यवहार ठरविण्यात आला होता. या व्यवहारादरम्यान वनविभागाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून वाघाचा एक दातसुळा, बिबट्याची दोन नखे आणि सोन्यामध्ये मढवलेले दोन सुळे जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई कुडाळ येथील काळप नाका बस डेपोच्या प्रवेशद्वारावर करण्यात आली.

सहाय्यक वनसंरक्षक (खा.कु.तो. व वन्यजीव), सावंतवाडी तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी, कुडाळ आणि त्यांच्या अधिनस्त वनकर्मचाऱ्यांनी मिळून ही कारवाई केली.

या प्रकरणातील मुख्य आरोपी रोहिदास हरिश्चंद्र कामत (वय ४८) हा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकात शिपाई म्हणून कार्यरत आहे. त्याने गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून वनाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. वनाधिकाऱ्यांनी बनावट ग्राहक म्हणून त्याच्याशी संपर्क केला असता, आरोपीने पैशांच्या आमिषापोटी त्यांना वेंगुर्ला बसस्थानकावर बोलावले.

यावेळी १२ वाघनखांच्या विक्रीसाठी २ लाख ५० हजार रुपयांचा व्यवहार निश्चित करण्यात आला. त्यानंतर वाघनखे घेऊन एक व्यक्ती कुडाळ बस डेपोमध्ये येईल आणि त्याला रोख रक्कम द्यावी, असे आरोपीने वनाधिकाऱ्यांना सांगितले.

त्यानुसार वनाधिकाऱ्यांनी कुडाळ येथील काळप नाका बस डेपो परिसरात सापळा रचला. आरोपी क्रमांक १ याने आरोपी क्रमांक २ च्या माध्यमातून आरोपी क्रमांक ३ याला वाघनखे दाखविण्यासाठी पाठवले. व्यवहाराची बोलणी सुरू असतानाच वनाधिकाऱ्यांनी तिन्ही आरोपींना बस डेपोच्या प्रवेशद्वारावर ताब्यात घेतले.

आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे वन्यप्राण्यांचे अवयव आढळून आले. यामध्ये वाघाचा ५ सेंमी लांबीचा एक दातसुळा, बिबट्याची ४ सेंमी लांबीची दोन नखे आणि २ सेंमी लांबीचे सोन्यामध्ये मढवलेले दोन सुळे यांचा समावेश आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत संरक्षित वन्यप्राण्यांच्या अवयवांची बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने हे अवयव बाळगल्याचा संशय असल्याने वनविभागाने ते जप्त केले.

या प्रकरणी वनपाल नेरूर तर्फ हवेली यांनी दिनांक २ नोव्हेंबर २०२६ रोजी प्र.गु.रि. ०३/२०२६ अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपींनी वन्यप्राण्यांची नखे विक्रीसाठी बाळगल्याची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करून कुडाळ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपी क्रमांक १ व २ यांना दोन दिवसांची वनकोठडी, तर आरोपी क्रमांक ३ याला न्यायालयीन कोठडी सुनावली.

वनाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, तसेच अतिरिक्त कार्यभार उपवनसंरक्षक किरण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुनील लाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन पाटील, वनपाल संजय हजारे, सूर्यकांत सावंत, गौरेश राणे, वनरक्षक अतुल खोत, ब्रह्मकुमार भोजने, अनिकेत माने, समीर खरवत, प्रवीण कमळकर आणि चालक राहुल मयेकर यांनी सहभाग घेतला.

वन्यजीव संरक्षणासाठी वनविभागाचे आवाहन

सिंधुदुर्ग जिल्हा गोवा आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेलगत असून पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेला जैवविविधतेने समृद्ध जिल्हा आहे. या परिसरात वाघांचे ऐतिहासिक अस्तित्व असून कर्नाटकातील भीमगड अभयारण्य, गोव्यातील म्हादई व्याघ्र प्रकल्प आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांना जोडणारा हा महत्त्वाचा वन्यजीव कॉरिडॉर आहे.

वन्यप्राण्यांची शिकार किंवा त्यांच्या अवयवांची तस्करी यासंदर्भात कोणाकडेही माहिती असल्यास ती वनविभागाला कळवावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन प्रभारी उपवनसंरक्षक किरण जगताप यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page