हळदीचे नेरूरच्या सहा प्रमुख प्रश्नांवर आमदार निलेश राणे सकारात्मक; विकासकामे लवकरच मार्गी लागणार

फुटब्रिजसह रस्ते, शाळा दुरुस्तीसाठी निधीचे आश्वासन

सिंधुदुर्ग प्रतिनिधी
हळदीचे नेरूर गावातील विविध विकासकामे आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांची शनिवारी (दि. १४ नोव्हेंबर) अंधेरी येथील कार्यालयात सदिच्छा भेट घेण्यात आली. माजी सरपंच दिलीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली हळदीचे नेरूर ग्रामस्थ विकास मंडळ, मुंबईच्या वतीने या भेटीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी गावासाठी फुटब्रिज बांधकामाचा निधी मंजूर करून कामाला सुरुवात केल्याबद्दल आमदार राणे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पालमळी जटाशंकर मंदिर रस्ता आणि देवघरवाडी, कुंदणवाडी, अंजीवडे व वसोलीला जोडणाऱ्या रस्त्यांच्या खडीकरण व डांबरीकरणाची कामे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

न्यू इंग्लिश स्कूल, हळदीचे नेरूरच्या दुरुस्तीसाठी तातडीने १० लाखांचा निधी जाहीर करत उर्वरित १५ लाख रुपयेही लवकरच देण्याचे आश्वासन दिले. टाळंबा धरणाच्या संपादन न झालेल्या जमिनीवरील सातबारा नोंदीचा प्रश्न विधानसभा अधिवेशनात लक्षवेधीद्वारे मांडण्याचे, तसेच १,४४० आकारीपड जमीनधारकांच्या हक्कांचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासनही आमदारांनी दिले.

गावाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही आमदार निलेश राणे यांनी यावेळी दिली. या भेटीमुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून, सर्वांनी एकत्र येऊन विकासकामांसाठी लोकप्रतिनिधींच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन दिलीप सावंत व भिकाजी सावंत यांनी केले.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष दाजी पालकर, सचिव भिकाजी सावंत, बाळा पालकर, भिकाजी नेरकर, एस. के. कविटकर, प्रशांत पालकर व विठ्ठल खंदारे, अमित पालकर आदी उपस्थित होते. भेट सकारात्मक व समाधानकारक झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page